चंदीगड, 4 डिसेंबर : बाळाचा जन्म ही महिलेच्या आयुष्यातील एक खास बाब असते. अनेक जण खूप पूर्वीपासून आपल्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याची तयारी करत असतात. पंजाबमधील (Punjab) एका गर्भवती महिला याबाबतीत सुदैवी नव्हती. या गर्भवती महिलेने डिलिव्हरीच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच आई आणि मुलीसह आत्महत्या (Sucide) केली.
पंजाबमधील तरणतारण शहरातील हा धक्कादायक प्रकार आहे. गर्भवती महिलेने आपल्या आई आणि मुलीसोबत अंतिम फोटो काढला, तीन पिढ्या एकत्र असलेला तो फोटो नातेवाईकांना पाठवला. त्यानंतर थोड्याच वेळात तिघींनी त्यांचे आयुष्य संपवले. या महिलेच्या चारित्र्यावर नवऱ्याचा संशय होता. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. गितींदर कौर असं या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ती पंजाबमधील तरणतारणची रहिवाशी होती. आत्महत्येच्या वेळी गितींदरच्या पोटात नऊ महिन्यांच बाळ होतं. त्या बाळाचाही जन्मापूर्वीच मृत्यू झाला.
गितींदरचे लवप्रीत सिंह कौर या व्यक्तीशी पहिले लग्न झाले होते. दोघांचे परस्परांशी न पटल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर राजबीर सिंह या तरुणाशी तिचे प्रेम जमले आणि दोघांनी लग्न केले. गितींदरला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. दुसऱ्या लग्नानंतर ती पुन्हा गर्भवती राहिली. तिचा नववा महिना सुरु होता. त्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी तिची आई देखील घरी आली होती. गितींदरचा नवरा राजबीर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच तो तिचा हुंड्यासाठी देखील छळ करत असे. त्याचबरोबर तो तिचा संपूर्ण पगारही हिसकावून घेत असे. नवऱ्याकडून होणाऱ्या सततच्या छळाला गितींदर त्रासली होती.
पोलिसांकडे केली होती तक्रार!
गितींदरने नवऱ्याच्या जाचाची पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिंसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती आता समोर आली आहे. गितींदरच्या नवरा राजबीरला वेगवेगळ्या शस्त्रांसह फोटो काढण्याची हौस आहे. पोलिसांनी आता या प्रकरणी राजबीरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.