वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 30 जून : काही दिवसांपूर्वी शहरातील एका खाजगी बँकेत अजब चोरीचा प्रकार घडला होता. भरदिवसा बँकेतून एका ग्राहकाचे लाखो रुपये लुटल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत तब्बल 2 लाख रुपये लंपास करण्यात आले होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. लोक बँकेत जाताना धास्तावत होते. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. बँकेचा कर्मचारी असल्याचं भासवून ग्राहकांकडील रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून तिघांना अटक दीपककुमार मेहंगी, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून सुनील गर्ग आणि सुरजकुमार मेहंगी हे त्याचे साथीदार आहेत. लष्कर पोलिसांनी या तिघांना अटक केली. या आरोपींनी राज्यातील 17 गुन्ह्यांसह देशभरात एकूण 49 गुन्हे केल्याचं उघडकीस आलंय. हे आरोपी बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील नोटा खराब असल्याचं सांगायचे. त्यानंतर कॅशियरकरून नोटा बदलून आणतो असं सांगत नोटांचं बंडल घेऊन पसार व्हायचे. अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत देशभरातील विविध बँकांमधून ग्राहकांखडील लाखो रुपये लंपास केले आहेत. वाचा - 2 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ कॉल महागात; पुण्यातील शिक्षिकेला विद्यार्थ्याकडून ब्लॅकमेल, काय आहे प्रकरण? पैसे भरण्यासाठी बँकेत आला अन्.. पीडित अक्षय काही दिवसांपूर्वी 2 लाख रुपये इंडसइन्ड बँकेत भरण्यासाठी आला होता. 2 लाख रुपयांची रक्कम पत्नी कविता गोटे हिच्या अकाऊंटवर भरण्यासाठी तो बँकेतील स्लिप भरत असताना त्याच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला. आरोपीने फिर्यादीला बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवले. आम्हाला एटीएममध्ये पैसे भरायचे आहेत. तुमची स्लिप लवकर भरा असे सांगितले.
यानंतर तो माणूस काऊंटरवर तेथील मॅडमशी बोलू लागला. त्यानंतर पुन्हा तो माणूस अक्षयजवळ आला आणि त्याने मला पैसे द्या, असे सांगितले. तेव्हा हा चोर बँकेतील कर्मचारी असल्याचे तक्रारदाराला वाटले. तक्रारदाराने चोराला पैसे दिले आणि तो स्लीप भरू लागला. स्लीप भरल्यावर जेव्हा तो कॅश काऊंटरवर गेला तेव्हा त्याला तो माणूस दिसला नाही. चोर ती रक्कम घेऊन लंपास झाला होता.

)







