पुणे 19 ऑक्टोबर: पुण्यात गेल्या 19 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वकिलाचं गूढ अखेर उकललं आहे. या वकिलाचं अपहरण करून खून झाल्याची धक्कादाय माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. जमिनीच्या वादातून ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती असल्याचंही ते म्हणाले.
खास 3 पथकं स्थापन करून पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सर्व अत्याधुनिक साधनांचा वापर करत हे गुढ उकलून काढलं आहे. यासाठी त्यांनी आपल्या खबऱ्यांचाही उपयोग करून घेतला आणि तब्बल 19 दिवसानंतर हे गुढ उकललं गेलं.
1 ऑक्टोबरला शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून उमेश चंद्रशेखर मोरे हे वकिल बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती तसेच अपहरणाचा संशयही व्यक्त केला होता. नंतर ते अपहरणच असल्याची माहिती पोलिसांना कळाली होती. आरोपींनी मोरे यांना न्यायालयाच्या आवारातून मोटरसायकलवर नेलं असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झालं होतं.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी 2 पथकं तयार केली होती. त्यांनी गेली 19 दिवस कसून तपास करत सगळा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर, रोहित दत्तात्रय शेंडे या आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
चोराचं धाडस पाहून पोलीसही हादरले! ट्रक जप्त केल्यानंतर केलं असं काही....
मोरे यांचं अपहरण करण्यात आलं होतं. नंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि नंतर मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावण्यात आल्याचंही पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे अशी माहितीही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
जमिनीचा वाद नेमका काय आहे? त्यात किती आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकरणात सुपारी दिली होती का? असेल तर ती कुणी दिली? असे अनेक प्रश्न आता विचारण्यात येत असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.