पुणे जिल्ह्यात शिवबा संघटनेच्या तरुणावर धारदार शस्रांनी हल्ला करून हत्या, 5 संशयित ताब्यात

पुणे जिल्ह्यात शिवबा संघटनेच्या तरुणावर धारदार शस्रांनी हल्ला करून हत्या, 5 संशयित ताब्यात

लोणीकंद पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

  • Share this:

पुणे, 15 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा (ता. हवेली) येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिवाजी कुमकर (वय 40) यांच्यावर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला व अपहरण करून त्यांचा खून केला. लोणीकंद पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सुषमा गोविंद कुमकर यांनी फिर्याद दिली असून याबाबत लोणीकंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी दहाच्या सुमारास गोविंद कुमकर हे घरातून बाहेर पडून पेरणेफाटा येथे पुणे-नगर रस्त्यालगत संतकृपा कॉम्प्लेचे समोर आले होते. त्यावेळी अचानक अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच स्कॉर्पियो जीपमधून त्यांचे अपहरणही केले. भरदिवसा अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट उडाली.

घटनास्थळी उभी असलेली त्यांची होंडा सिव्हीक मोटार (क्र. एम. एच. 12जी. के. 8176), संतकृपा बिल्डींगमध्ये जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडलेले रक्त, हातावरील घड्याळ, एक चष्मा, व एक मोबाईल या साहित्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. पोलिसांनी पाच संशयितांना तपासासाठी ताब्यात घेवून तपास पथकेही तयार केली आहेत.

या हल्ल्यामागे नेमके कोण व हल्लेखोरांचा काय उद्देश होता, याचा पोलीस पथक शोध घेत आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा कुमकर यांचा मृतदेह वाडेबोल्हाई गावच्या पुढे पिंपरी सांडस परिसरात वनविभागाच्या हद्दीत आढळून आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत पडळकर हे करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 15, 2020, 11:16 PM IST

ताज्या बातम्या