पुणे, 2 डिसेंबर : पोलिसांना (Police) आपण आपले रक्षक मानतो. पण खाकी वर्दीमध्ये काही विकृत माणसं त्यांच्या कुकृत्यातून पोलीस खात्याचं नाव बदनाम करतात. असाच काहिसा प्रकार पुण्याच्या सांगवी पोलीस ठाण्यातून (Pune Sangavi Police Station) समोर आला आहे. सांगली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक यांनी शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे. या आरोपींनी एका व्यक्ती विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीकडे 1 लाखांची लाच (Bribe) मागितली. तसेच लाच दिली नाही तर त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करु, अशी धमकी दिली. त्यामुळे 42 वर्षीय पीडित व्यक्ती प्रचंड घाबरला होता.
पीडित व्यक्तीची एसीबीत तक्रार
पोलिसांकडून होणाऱ्या मानसिक छळाविरोधात अखेर संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती समजून घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारदार व्यक्तीला त्यांच्यासमोर फोन करायला सांगितलं. यावेळी आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक देसाई यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 25 आणि 26 नोव्हेंबरला या प्रकरणाची पडताळणी केली. यावेळी तक्रारदार व्यक्तीसोबत बातचित करताना लाचेची रक्कम कमी करण्याबाबत चर्चा झाली. अखेर हेमा सोळुंकेच्या आदेशानुसार अशोक देसाईने 75 हजार रुपये तडजोडीअंती मान्य केलं.
हेही वाचा : 400 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुणे कनेक्शन? आयकर विभागाची मोठी कारवाई
एसीबी अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी प्लान आखला. आरोपींना रंगेहाथ पकडता यावं यासाठी आरोपी सांगतील तिथे तक्रारदार व्यक्तीला 75 हजार रोख रक्कम घेऊन पाठवण्याचं ठरविण्यात आलं. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदार आज (2 डिसेंबर) पैसे देण्यासाठी आरोपींकडे गेला. त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक देसाई याने तक्रारदाराकडून 75 हजाराची रोख रक्कम घेतली. विशेष म्हणजे लाच घेतल्यानंतर लगेच एसीबीचे अधिकारी त्याला पकडण्यासाठी पुढे आले. पण तो त्यांना जोराचा धक्का देवून बाहेर पडला. त्यानंतर तो त्याच्या दुचाकीने पैसे घेऊन फरार झाला.
एसीबी अधिकारी अशोक देसाई याचा शोध घेत आहेत. पण या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके हिला बेड्या ठोकल्या. एसीबी अधिकारी आरोपीची चौकशी करत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. संबंधित कारवाई ही पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, सपोफौ शेख, पो.हवा. नवनाथ वाळके, पो.ना. वैभव गिरीगोसावी, म.पो.शि. पूजा पागिरे या पथकाने केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.