कल्याण, 3 जानेवारी : लोकलमध्ये चोरट्याने मोबाईल हिसकाहून पळ काढला. याच चोरट्याला पकडण्याच्या नादात प्रवाशी लोकल खाली येण्यापासून थोडक्यात बचावला आहे. कल्याण जीआरपीने मोबाईल हिसकावून पळणाऱ्या त्या चोरट्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने अवघ्या 24 तासातच अटक केली आहे.
नाशिकमध्ये राहणारे विनायक उन्हाळे मुंबई एअरपोर्ट येथे कॅन्टीनमध्ये कामाला आहेत. ते रोज नाशिक ते मुंबई असा प्रवास करतात. गुरुवारी त्यांची नाईट ड्युटी होती. शुक्रवारी सकाळी त्यांनी घाटकोपरहून कसारा लोकल पकडली. 10 वाजून 50 मिनिटांच्या आसपास गाडी आंबिवली रेल्वे स्थानकात उभी असताना एक तरुण गाडीत चढला.
चोरट्याने विनायक यांच्या हाती असलेला महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. विनायक हे देखील चोरट्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी पळाले. इतक्यात गाडी सुरु झाली. त्यामुळे गाडी पकडण्याच्या नादात त्यांचा तोल गेला. मात्र ते थोडक्यात बचावले. अन्यथा चालत्या गाडीखाली सापडले असते. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याण जीआरपीने त्या चोरट्याचा शोध सुरू केला. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शादरूल आणि तपास पथकाने शोध काम सुरू केले. पोलिसांना तपासात यश आले. अखेर 24 तासाच्या आत मोबाईल हिसकावून पळणाऱ्या मारुती सकट याला अटक केली आहे. त्याने अन्य किती गु्न्हे केले आहेत, याचा पोलीस तपास करीत आहेत. मात्र सर्व सामान्य वर्गाला स्टेशन आणि लोकल एण्ट्री नसताना या चोरट्याला प्रवेश कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.