पिंपरी चिंचवड, 18 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) गेल्या दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज पोलीस दलातील दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चार सराईत गुन्हेगाराकडून तब्बल 14 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतुसे (14 pistols and 8 cartridges) हस्तगत केली आहेत, धक्कादायक बाब म्हणजे, हस्तगत केलेली पिस्तुल विक्रीसाठी आणल्या गेल्याचीही माहिती उघडकीस आली आहे.
या कारवाई बाबत अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसात सांगवी आणि चाकण परिसरात गोळ्या घालून खून केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पिस्तुल वापरणारे सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं होतं. या दरम्यान काही संशयित भोसरी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांच्या कडील शस्त्रसाठा जप्त केला तर दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले.
(ताजमहालापेक्षा 5 पट मोठा लघुग्रह येतोय पृथ्वीच्या दिशेनं, उरले अवघे काही तास...!)
आकाश अनिल मिसाळ, रुपेश सुरेश पाटील, ऋतिक दिलीप तापकीर असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं असून ह्यातील रुपेश पाटील याने मध्यप्रदेशमधून आणलेल्या पिस्तुल पैकी दोन पिस्तुल अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता नामक तरुणाला विकले असल्याचं तपासात निष्पन्न झाल्या नंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
(बिग बॉस मराठी फेम आदिश वैद्यला गर्लफ्रेंडने काढलं घराबाहेर ? का ते पाहा....)
दरम्यान, आरोपी आकाश आणि रुपेश हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून रुपेशकडून या आधीही तब्बल 24 पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शस्त्रांची तस्करी करणारं मोठी टोळी पुणे पिंपरी चिंचवड परिसरात सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय असून लवकरच टोळीतील इतर सदस्यांना जेरबंद केलं जाईल असा विश्वास दरोडा विरोधी पथकाचे प्रमुख उत्तम तांगडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्य गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकामध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाई नंतर पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी कृत्यांना आळा बसतो का याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.