मुंबई, 28 एप्रिल : एका सात वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर पोलिसांनी (ghatkopar police) 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सचिन अनंत शामा असे 35 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमका प्रकार?
घाटकोपरच्या आनंद नगर विभागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली होती. यानंतर या आरोपीने तिच्यासोबत गोडगोड बोलायला सुरुवात केली आणि तो घाटकोपरच्या वडापावच्या दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नराधम मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने या सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केले. त्यानंतर तिथून पळ काढला.
या घटनेनंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिलं आणि पोलिसांना तसेच तिच्या नातेवाईकांना कळवले. पोलिसांनी लगेचच मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. यात पोलिसांना आरोपीचा फोटो मिळाला. पोलिसांनी तात्काळ भिवंडी येथे सापळा रचून त्याला 24 तासांच्या आत अटक केली.
आरोपीची पार्श्वभूमी -
सचिन शामा हा घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलीस ठाण्यात पाच अशाच प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. आरोपी अशाच गुन्ह्यांमध्ये कोठडीत असून कोरोना काळात कोठडीतून बाहेर आल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी घाटकोपर पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
हेही वाचा - लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरीनं नवरदेवाला चपलीनं चोपलं; पतीवर केला गंभीर आरोप
पुण्यातही अल्पवयीन मुलीचा विनयभंग
काही दिवसांपूर्वीच पुण्यातच एका रिक्षाचालकाने 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना बावधन (Bavdhan) परिसरात घडली होती. पीडित मुलगी खासगी शिकवणीहून परत येत होती. त्यावेळी ही घटना घडली. ही 12 वर्षीय पीडित मुलगी तिच्या स्टडी रुममधून बाहेर पडली. यानंतर दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास ती बावधन येथील एलएमडी चौकात आली.
यानंतर तिथे एका रिक्षाचालक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ आला. यावेळी त्याने तिचा विनयभंग केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर ती मुलगी घरी गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Police, Rape on minor, Sexual harassment