उस्मानाबाद 23 ऑक्टोबर: कळंब तालूक्यातील पिंपळगाव (डो) येथील सहा वर्षाच्या कृष्णा गोरोबो इंगोले याचा नरबळी दिल्या प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. मृत चिमुकल्याची सख्खी आत्या, चुलता, चुलती, आजोबा यांनी पुणे येथील मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे उघड झालं होतं. 26 जानेवारी 2017 रोजी कृष्णा हा शाळेतून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून त्यांचे पिंपळगाव (डो) येथील वस्तीवरील घरी दुपारी बारा वाजता आला.
त्याची आई नसल्याने तो घराबाहेर खेळत होता. मात्र नंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही तो मिळुन आला नसल्याने शेवटी 26 जानेवारी 2017 रोजी कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी मुलाचं अपहरण केल्याची तक्रार दिली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 जानेवारीला सकाळी अकराच्या सुमारास शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला होता.
या प्रकरणाचा तपास कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक डी. डी. बनसोडे यांनी केला. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक सुनिल नेवसे यांनी केला. या प्रकरणी केलेल्या तपासात कृष्णाची सख्खी आत्या द्रोपदी पौळ हीने त्याला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्याला आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील सामाईक विहीरीवर दाट झाडीत घेऊन गेली. त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले.
विरारमध्ये भररस्त्यात महिलेचा राडा; रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केल्याचा VIDEO
आरोपीच्या घरात शांतता नव्हती, आरोपी द्रोपदी हिच्या मुलीचे दोन पती मयत झाले होते. एका मुलीची मुले जगत नव्हते, मयत कडुबाईचा व साहेबरावच्या पत्नीचा आत्मा भटकत असल्याने हे सर्व होत आहे. त्यासाठी रक्ताच्या नात्यातील मुलाचा नरबळी द्यावा लागेल असे पुणे येथील मांत्रिक आरोपी राहुल उर्फ लखन चुडावकर व सुवर्णा भाडके यांनी बाकीच्या आरोपींना सल्ला दिला. घटनेच्या आधीपासुन आरोपी उत्तम व पत्नी उर्मीला हे सर्व कुटुंबासह पुणे वास्तव्यास होते. त्या ठिकाणी मांत्रिक आरोपीची ओळख झाली होती.
सर्व आरोपी पिंपळगाव येथे अमावस्या, पोर्णीमेला पूजा करण्यासाठी येते असत. घटनेच्या अगोदर पंधरा दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे येऊन आरोपींनी कट कारस्थान करुन कृष्णा याचा नरबळी देण्याची योजना बनविली. त्यासाठी त्यानी आरोपी उत्तमच्या घराशेजारी खड्डा खोदून त्याठिकाणी मयत कडुबाईची समाधी बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं होतं.
रक्ताच पाणी करुन ज्याला वाढवलं त्याच लेकराचा आईने कुऱ्हाडीने कापला गळा
या प्रकरणात आरोपी व मयत यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाईलचे रेकॉर्डींग व टॉवर लोकेशन, कराड येथील मुर्तीकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांची साक्ष महत्वुपूर्ण ठरली. या प्रकरणातील काही महत्वाचे साक्षीदार फितुर झालेले होते. गुन्हा पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झाला नव्हता. मात्र कृष्णाच्या मृत्युपूर्वी व मृत्युनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनाची साखळी परिस्थिती जन्य पुरावा पुर्ण करण्यात सरकारी पक्षाला यश आले. सरकारी वकील अॅड. सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.