अहमदनगर, 02 डिसेंबर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare) यांच्या हत्या प्रकरणाचा महाराष्ट्राला हादरावून सोडणारा खुलासा झाला आहे. रेखा जरे यांची सुपारी ही अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिल्याचे तपासातून समोर आले आहे. बाळासाहेब बोठे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
रेखा जरे हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी आज पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.
बाळासाहेब बोठे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आल्यामुळे नगरमध्ये पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार या आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते.
गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.