अलीगड, 16 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) अलीगड जिल्ह्यातील पालीमुकीमपुर भागात लग्नाच्या काही तासांनंतंर नवरदेवाच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवरदेवाच्या हत्येमागील कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल. नवरदेवाने मित्रांसाठी दारुची सोय केली नव्हती, यामुळे रागाच्या भरात मित्रांनी नवरदेवाची हत्या केली. या घटनेनंतर जवळपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, सोमवारी रात्री गावात पालीमुकीमपूरमध्ये बबलूच्या (28) लग्नात दारूची सोय करण्यात आली नव्हती. यावरुन त्याचा मित्रांसोबत वाद झाला. त्यानंतर मारहाण झाली व शेवटी मित्रांनी त्याच्या पोटात सुरा घुसवला. गंभीर व अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे त्याचा मृत्यू झाला.
लवकरच आरोपींना होणार अटक
पोलीस क्षेत्राधिकारी नरेश सिंह याने बुधवारी सांगितलं की, मुख्य आरोपी नरेश सिंह याला अटक करण्यात आली आहे. तर पाच आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्नाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यातही अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातील मुरैना येथे "वधू आणि वर आणि मेहुणी" चं एक विचित्र प्रकरण समोरं आलं आहे. आपण क्वचितच ऐकलं असेल, की लग्न केलं नवरीसोबत आणि पळवलं नवरीच्या बहिणीला. ही घटना मध्यप्रदेशातील पद्दापुरा या गावातील आहे. येथे एका अल्पवयीन मुलीचं लग्न झालं, परंतु कायदेशीर विरोधामुळे ते अमान्य ठरवलं गेलं. लग्न आणि अपहरण या दोन्हीतून मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. पण नवरा मुलगा अद्याप फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.