Corona झाल्याचं सांगून नवरा मुंबईतून झाला गायब; दुसऱ्या शहरात थाटला प्रेयसीबरोबर संसार

Corona झाल्याचं सांगून नवरा मुंबईतून झाला गायब; दुसऱ्या शहरात थाटला प्रेयसीबरोबर संसार

'मला कोरोना झाला आहे आणि आता मी मरणार', असं बायकोला सांगून हा तरुण नवी मुंबईतून गायब झाला. पण पोलीस तपासात त्याचं भांडं फुटलं आणि त्याने दुसरा संसार मांडल्याचं उघड झालं.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर :  सध्या जगभरात Coronavirus ची साथ पसरली आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.  कोरोनाची धास्ती अनेकांच्या मनात आहे. पण या काळात अनेक विचित्र घटनाही समोर येत आहेत. कोरोना काळात  बायकोपासून आपलं अफेअर लपवण्यासाठी नवऱ्याने चक्क आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून आपण आता मरणार असल्याची बतावणी केली. कसं उलगडला हा बनाव वाचा..

नवी मुंबईतल्या तळोजा इथली ही घटना. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतची बातमी दिली आहे. एका 28 वर्षीय विवाहित तरुणाने स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती पत्नीला दिली. 'मला कोरोना झाला आहे आणि आता मी मरणार', असं बायकोला सांगत त्याने फोन कट केला. त्यानंतर त्याचा फोनच लागत नव्हता.

21 जुलैनंतर हा तरुण गायब झाला. त्याची तक्रार बायकोच्या नातेवाईकांनी पोलिसांत नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, हा तरुण कुठल्याच कोरोना केअर सेंटर, रुग्णालय किंवा कुठेच सापडला नाही. पोलिसांनी अगदी शेवटची शक्यता लक्षात घेऊन वाशीच्या खाडीतही तपास केला, असं या प्रकरणी तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितलं.

पोलीस शेवटपर्यंत त्याच्या फोनचं लोकेशन शोधायचा प्रयत्न करत होते. एकदा फोनचं लोकेशन मध्य प्रदेशात सापडलं. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी थेट मध्य प्रदेशात इंदोरला गेला होता. एवढंच नाही तर तिथे तिच्याबरोबर नाव बदलून संसारही त्यानं थाटला होता.

सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक वस्त यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘कोरोनाची लागण झाल्याचं सांगत आपण लवकरच मरणार असल्याचं त्याने बायकोला सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. दुसऱ्याच दिवशी त्याच्या मेहुण्याला वाशी परिसरातील एका गल्लीत त्याची दुचाकी आणि बॅग, पाकिट आढळून आलं. याप्रकरणी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यादृष्टीनेच तपास सुरू होता.’ याप्रकरणी पोलिसांनी सगळी कोरोना केंद्र, रुग्णालयं तपासली. वाशी खाडीतही त्या तरुणाचा शोध घेण्यात आला. मागच्या आठवड्यात पोलिसांना इंदोर इथे या मोबाइलचं लोकेशन सापडलं. नवी मुंबई पोलिसांनी इंदोर गाठलं असता त्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पितळ उधडं पडलं. तो तेथे स्वतःची ओळख लपवून घर भाड्याने घेऊन राहात होता, असं पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितलं. या तरुणाला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलं आणि मुंबईला आणून त्याच्या पत्नीच्या ताब्यात दिलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 17, 2020, 7:02 PM IST

ताज्या बातम्या