नागपूर, 12 डिसेंबर : मानलेल्या बहिणीसोबत का बोलतो, या रागातून एका गुंडाने नागपुरात 30 वर्षीय विवाहित तरुणाचा खून केला आहे. यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरी रेल्वे अंडर ब्रिजच्या जवळ आज सकाळी ही हत्या झाली आहे. किशोर नंदनवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
शेख सिराज उर्फ शेरखान असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी शेर खानवर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आहेत.
विशेष म्हणजे 36 तासांपूर्वीच नागपुरात कथित एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर आता मानलेल्या बहिणीसोबत बोलतो या रागातून गुंड वृत्तीच्या भावाने एकाची हत्या केली आहे. नागपुरातील प्रेमप्रकरणातून गेल्या चार दिवसात झालेली हत्येची ही तिसरी घटना आहे.
दरम्यान, नागपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखीचा विशेष ठरत आहे. अशा घटना कमी करण्यासाठी सरकारला आता कठोर पाऊलं उचलावी लागतील, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.