नागपूर, 20 सप्टेंबर : नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनाचे सत्र सुरूच आहे. शहरातील कन्हान पोलीस ठाण्यातील कर्मचारी रवी चौधरी यांच्यावर रेती तस्करांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कन्हाळ भागात 16 सप्टेंबर रोजी रात्री ही घडना घडली होती. रवी चौधरी असे हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कमलेश मेश्रामला अटक करण्यात आली आहे. कमलेश मेश्राम हा सराईत गुन्हेगार आहे.
रवी चौधरी यांनी कमलेश मेश्राम आणि त्याच्या भावाच्या अवैध धंद्यावर नुकतीच कारवाई केली होती. रेती घाटाला परवानगी नसतानाही अवैध उपसा केला जात होता. कमलेशचा भाऊ अवैद्य रेतीची तस्करी करत होता. त्यामुले आरोपीच्या भावावर रवी चौधरींनी कारवाई केली होती. त्याचाच राग मनात धरून कमलेश मेश्राम याने धोक्याने रवी चौधरी यांना 16 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना गौरगिवरा चौकात बोलावले होते.
चौधरी हे तिथे पोहोचताच कमलेशने वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे त्याचे इतर चार सहकारी हजर होते. अचानक चौघांनी रवी चौधरी यांच्यावर चाकूने हल्ला केला. पोट आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चौधरी जागेवरच कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चौधरींना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी अवस्थेत असलेल्या चौधरी यांना सुरुवातील कामठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
पोलिसांनी आरोपी कमलेश मेश्रामला अटक केली असून त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.