नागपूर, 19 ऑक्टोबर : नागपुरात चोरट्याने कोणती छोटी मोठी वस्तू नाही तर तब्बल 20 टन लोखंड भरलेला भला मोठा ट्रक चक्क पोलीस स्टेशन समोरून चोरून नेला आहे. त्यापेक्षाही जास्त धक्कादायक बाब म्हणजे चोरट्याने जो ट्रक चोरला आहे तो ट्रक पोलिसांनी त्याच चोराकडून जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये उभा केला होता.
संजय ढोणे असं ट्रक चोरणाऱ्या चोरट्याचं नाव आहे. त्याने अगोदर 9 ऑक्टोबर रोजी सुमित पोद्दार या लोखंड व्यापाऱ्याचा 20 टन लोखंड लादलेला ट्रक लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुष्करणा भवन समोरून चोरला. लाखोंचा मुद्देमाल भर रस्त्यातून चोरीला गेल्यामुळे पोलिसांनी चारही दिशेने पथक रवाना केले होते.
गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शीवरून तो ट्रक जप्त करून संजय ढोणे नावाच्या आरोपीला अटक केली होती. जप्त केलेला ट्रक आणि आरोपी लकडगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले होते. याच चोराकडून आणखी काही मुद्देमाल जप्त करायचे आहे, असे सांगून पोलिसांनी जप्त केलेल लोखंड आणि ट्रक व्यापाऱ्याला परत केले नव्हते.
दरम्यानच्या काळात न्यायालयातून चोरट्याला जामीन मिळाला आणि त्याने आज पहाटे लकडगंज पोलीस स्टेशनच्या अगदी समोर उभा असलेला तोच ट्रक पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा चोरून नेला आहे. लवकरच आम्ही चोरट्याला जेरबंद करू असे नागपूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.