Home /News /crime /

नागपूरमध्ये उच्चभ्रू वस्तीत पडक्या घरात जे आढळले, त्यानंतर उडाली एकच खळबळ

नागपूरमध्ये उच्चभ्रू वस्तीत पडक्या घरात जे आढळले, त्यानंतर उडाली एकच खळबळ

शहरातील उच्चभ्रू असलेल्या धंतोली परिसरात एका पडक्या घरात हा प्रकार घडला आहे.

    नागपूर , 13 जून : लाॅकडाउनच्या काळात शांत असलेल्या नागपूर शहरात आता गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून खून आणि हत्याचे सत्र सुरू आहे. अशातच शहरातील उच्चभ्रू असलेल्या धंतोली परिसरात एका पडक्या घरात कुजलेला मृतदेह आढळून आल्याने काल एकच खळबळ उडाली. धंतोली परिसरात या पडक्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या स्थानिकांनी पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून खुनाची शंका वर्तविली जात असली तरी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, मृताची ओळख अद्याप पटू शकली नाही. तो ३५ ते ४० वर्षे वयोगटातील आहे. हेही वाचा -हात न लावताच वाजणारी घंटा! कोरोना काळातही मंदिरात घुमणार घंटानाद धंतोलीतील असणारे हे पडके घर विवेक कुकरेजा यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. सध्या तिथे कुणी राहत नाही. या घराच्या शेजारी राहणाऱ्यांना तीव्र दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी लागलीच महापालिका आणि धंतोली पोलिसांना सूचना दिली. तातडीने मनपा आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. पडके घर असल्यामुळे अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण या परिसरात आढळून आले होते. त्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या पडक्या घरात आणून टाकला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, नागपूर शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही  दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 13 घटना घडल्या आहेत. तर नागपुरात शहरात आठ व्यक्तींची हत्या झाली आहे. हेही वाचा -महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी, गुजरातही देशात दुसऱ्या क्रमांकावर! नागपुरात प्रामुख्याने 27 मे रोजी एमआयडीसी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत खून, 29 मे रोजी पारडी पोलीस ठाण्यांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर 1 जूनला लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत, तसंच 2 जूनला कोतवाली आणि 3 जूनला यशोधरानगमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात संपूर्ण शहरात केवळ 5 खुनाच्या घटना घडल्या. मात्र दोन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चार हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. खुनांच्या वाढत्या घटनांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या