धमकीचं पत्र पाठवून हल्ला, नागपूरमध्ये भाजप महापौरांच्या गाडीवर गोळीबार

धमकीचं पत्र पाठवून हल्ला, नागपूरमध्ये भाजप महापौरांच्या गाडीवर गोळीबार

नागपूरचे महापौर संदीप जोशींसह त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला, पोलिसात तक्रार दाखल.

  • Share this:

प्रशांत मोहिते (प्रतिनिधी) नागपूर, 18 डिसेंबर: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी मंगळवारी रात्री गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यातून संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप बचावले आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी संदीप जोशी यांच्या कारवर एकामागोमाग एक तीनवेळा गोळ्या झाडल्या. वर्धा रोडवर एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा महापौर काही कारणानिमित्तानं त्यांच्या कुटुंबियांसोबत बाहेर गेले होते. काम आटपून घरी परतत असताना हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. यावेळी वर्धा रोडवर एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ दुचाकीवरून दोन अज्ञान तरूण आले आणि त्यांनी तीन राऊंड बंदुकीतून फायर केलं आणि त्यानी पळ काढला.

या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवानं संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप बचावले आहेत. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौरांवरील हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या आधी 4 डिसेंबर रोजी नागपूरच्या भाजप महापौरांना धमकीचं पत्र आलं होतं. या पत्रात त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रावरून महापौर संदीप जोशी यांनी नागपुरात तक्रार दाखल केली होती.

नागपूर महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रम हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. अतिक्रमण हटवल्याचा राग काहींचा मनात होता. त्या रागातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. सध्या कोणत्याही कारणावर पोलिसांनी दुजोरा दिला नाही. मात्र सध्या जोशी कुटुंबियांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. याशिवाय आधी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली नव्हती का?असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कारण धमकीचं पत्र आल्यानंतर महापौरांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि 14 दिवसांनी त्यांच्यावर जीवघेणा अशाप्रकारे हल्ला होतो. यामुळे अनेक सवालही उपस्थित होत आहे. सध्या महापौर आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या