मुंबई, 30 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी मुंबईतील अक्सा बीचवर (mumbai aksa beach) एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून या महिलेचा मारेकरी सासरा असल्याचं समोर आलं आहे.
24 डिसेंबर रोजी मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम भागातील अक्सा बीचवर पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. आता या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव नंदिनी राय असं आहे. ही मृत महिला कांदिवली पोयसर येथील रहिवासी असल्याचं उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला नंदिनी रायचं 3 वर्षांपूर्वी प्रेम-विवाह झाला होता. अगदी लग्नाच्या सुरुवातीपासूनच सासऱ्याला तिच्या चारित्र्यावर संशय होता. मृत नंदिनीचे आई-वडील अंधेरी येथे राहतात. तर नंदिनीचा पती पंकज राय लॉकडाउनमध्ये आपल्या गावी गेला होता. त्यामुळे घरात फक्त सासरा आणि सूनच होती. 55 वर्षीय सासरा कमल राय यांचा सून नंदिनीवर राग होता. सून घरात एकटी असल्याने, या संधीचा फायदा घेऊन सासऱ्याने दोन मित्रांच्या मदतीने 9 डिसेंबर रोजी घरातील उशीने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळून एका नालीत फेकून दिला.
यानंतर आरोपी सासरा उत्तरप्रदेशला निघून गेला. त्यावेळी नंदीनीच्या आई वडीलांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर मृत नंदिनीच्या आई वडीलांनी मुलीच्या सासर गाठले. कांदिवली पोयसार येथे आल्यानंतर मुलीच्या घराला कुलुप असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर त्यांनी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचदिवशी सासरा उत्तरप्रदेशला निघून गेला होता. समता नगर पोलिसांनी या हत्येप्रकरणी सासरा कमल राय सोबत त्यांचे मित्र प्रदीप गुप्ता आणि कृष्णा सिंह यांना अटक केली आहे. समता नगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.