मुंबई, 15 सप्टेंबर : सोशल मीडियावर दोघांची भेट झाली, भेटीतून चांगली मैत्री निर्माण झाली. पण या मैत्रीतून दोघांनी समलैंगिक संबंध ठेवले. पण जेव्हा या तरुणाने नकार दिला तेव्हा मित्राच्या मदतीनेच त्याचा 45 वर्षीय व्यक्तीचा काटा काढला. ही धक्कादायक घटना मुंबईतील नागपाडा भागात घडली. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाईम्स दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, नागपाडा पोलिसांमध्ये मुंबई महापालिकेत वरिष्ठ पदावर 45 वर्षीय व्यक्ती काम करत होती. पण, कामावर गेलेली ही व्यक्ती दोन दिवस झाली घरी परतली नव्हती. एवढ्या मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी 28 ऑगस्ट रोजी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. नागपाडा पोलिसांनी त्यांच्या मोबाइलवरून शेवटचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला. पण, मोबाइल फोन बंद होता. त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम काढण्यात आली का? हे तपासून पाहिले असता तसेही काही घडले नाही. अखेर पोलिसांनी त्यांना आलेल्या फोन कॉलची संपूर्ण माहिती जुळवली. तेव्हा शेवटचा फोन कॉल एका तरुणाने केल्याचे लक्षात आले. त्यावरून चौकशी केली असता सदरील तरुण हा एलफिस्टन भागात राहत असल्याचे कळाले. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पण, पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा बेपत्ता व्यक्तीचा खून केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी त्याच्यासह आणि एका तरुणाला ज्याने यात मदत केली त्याला अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी रेल्वे आणि प्राप्तिकर खात्यामध्ये नोकरीला होते.
समलैंगिक संबंधातून हत्या
पोलिसांनी या दोन्ही तरुणाची चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीने पोलीसही चक्रावून गेले. अटक करणाऱ्या आलेल्या एका आरोपीचे बेपत्ता व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध होते. दोघांची भेटही सोशल मीडियावर झाली होती. मैत्री झाल्यानंतर दोघेही मुंबईतील असल्यामुळे एकमेकांना भेटायला आहे. त्यानंतर दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाले.
मृत व्यक्तीने या तरुणासोबत कायम संबंध ठेवण्यास प्रयत्न केला. परंतु, या तरुणाच्या घरच्या मंडळींनी लग्न जमवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या आरोपी तरुणाने यापुढे लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला. नकार दिल्यामुळे मृत व्यक्ती दुखावली गेली. त्यानंतर या तरुणाकडे त्याने वारंवार मागणी केली. हा व्यक्ती आपला पिच्छा सोडत नसल्यामुळे आरोपी तरुणाने या व्यक्तीचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने आपल्या मित्राची मदत घेतली. दोघांनी या व्यक्तीला दारू पार्टी करण्यासाठी भिवंडीला बोलावले. दारू पाजून या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, या दोन्ही आरोपी तरुणांनी आधीच भिवंडीच्या जंगलामध्ये खड्डा खोदून ठेवला होता. हत्या केल्यानंतर या तरुणाचा मृतदेह ठरलेल्या खड्ड्यात नेऊन पुरला आणि फरार झाले.
पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा छडा लावला. या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, दुष्यन्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश मांजरेकर, उपनिरीक्षक एकनाथ देसाई, बी. डी. जाधव, अनिल शिंदे यांनी तपास केला.