नवी दिल्ली, 02 जानेवारी: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यानं विम्याचं पैसे मिळवण्यासाठी दत्तक घेतलेल्या भारतीय मुलाची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जोडप्यांनी सर्वप्रथम भारतातील एका मुलाला दत्तक घेतलं आणि त्याच्या नावावर दीड करोड रुपयांचा विमा काढला. त्यानंतर या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी या जोडप्यांनी थंड डोक्याने दत्तक मुलाचा काटा काढला आहे. पण या जोडप्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भारत सरकारने या जोडप्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली होती. मात्र मानवाधिकाराच्या कायद्यांमुळे त्यांचा प्रत्यार्पण होण्यात अडचणी येत आहेत.
डेली मेलने दिलेल्या वृतानुसार, 55 वर्षीय आरती धीर आणि त्यांचा पति 31 वर्षीय कवल रायजादा हे दोघंही ब्रिटनमधील हीथ्रो विमानतळावरील माजी कर्मचारी आहेत. या जोडप्याने 2015 साली गुजरातमधील मलिया हटिना या गावातील एका अनाथ मुलाला दत्तक घेतलं होतं. या मुलाचं नाव गोपाल सेजानी असं आहे. दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने या मुलाच्या नावावर 'वेल्थ बिल्डर' विमा पॉलिसी खरेदी केली.
दत्तक घेतल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2017 मध्ये 11 वर्षांचा मुलगा गोपाळ नातेवाईकांसोबत राजकोटला गेला होता. राजकोटवरून परत येत असताना गोपाळ आणि त्याच्या नातेवाईकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गोपाळ आणि त्याचे नातेवाईक हरसुखभाई कारदानी यांचा मृत्यू झाला.
या हत्येत सामील असणारा आरोपी नितिश मुंद हा या जोडप्यासोबत एकाच फ्लॅटमध्ये राहतो. त्याचबरोबर या हत्या करण्यासाठी कवल रायजादा यांनी आपल्याला पैसे दिल्याची कबुलीही मुंद यांनी दिली आहे. सध्या मुंद हा तुरुंगात आहे. ब्रिटनचे चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा आर्बुथनॉट यांनीही आपल्या निर्णयामध्ये म्हटलं होतं की, या प्रकरणात मिळालेल्या पुराव्यावरून प्रथमदर्शनी असं दिसतंय की, या हत्येच्या गुन्ह्यात इतर लोकांसोबत या जोडप्याचा हात आहे.
ब्रिटनचे खासदार टिम लूघटन यांनीही या जोडप्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, एका निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्याला आपण ब्रिटनच्या रस्त्यावर मोकळं फिरताना पाहायचं आहे का? तथापि या जोडप्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.