मुंबई, 11 फेब्रुवारी : काही गुन्हेगार फार हुशार असतात. गुन्हा केल्यानंतर ते सहजासहजी पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. मात्र, पोलीस शेवटी पोलीस असतात, एखाद्या गुन्हेगाराचा माग काढण्याचा निश्चय जर त्यांनी केला तर त्याला पकडल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी शक्कल लढवून 16 वर्षांपासून फरार असलेल्या प्रवीण जडेजा नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या एका माजी सहकाऱ्याशी संपर्क साधला. त्याच्या माध्यमातून आरोपीची विमा पॉलिसी मॅच्युअर झाली असल्याची सूचना आरोपीपर्यंत पोहचवली. पॉलिसीची रक्कम परत मिळवण्यासाठी हा आरोपी मुंबईत आला असता, पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून फरार झाल्यानंतर आरोपी जडेजा कच्छ जिल्ह्यातील शभराई गावात भाजी विक्रेता म्हणून काम करत होता. त्यानं 2007 मध्ये मुंबईतील त्याच्या मालकाचे 40 हजार रुपये चोरी केले होते. आरोपी ज्या व्यक्तीकडे काम करत होता ते, ए. एच. गांगर हिंदमाता येथील कापड व्यापारी आहेत. त्यांनी दादरमधील काही दुकानदारांकडून थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी तत्कालीन 24 वर्षीय सेल्समन असलेल्या जडेजाला दिली होती. जडेजानं 40 हजार रुपये थकबाकी वसूल केली. पण, परत आल्यानंतर त्यानं आपल्या मालकाला सांगितलं की, कोणीतरी रोख रक्कम असलेली बॅग चोरली.
हेही वाचा : पत्नीवरुन टोमणा मारल्याने पतीने थेट डोक्यात दगड.. तपासात धक्कादायक कारण समोर
रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. जडेजा खोटं बोलत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 408 अंतर्गत (नोकराद्वारे विश्वासघाताचा फौजदारी) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर जडेजानं न्यायालयीन सुनावणीला जाणं बंद केलं आणि तो मुंबईतून फरार झाला. जेव्हा पोलिसांनी त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर दादर न्यायालयानं त्याला फरार घोषित केलं आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.
काही दिवसांपूर्वी झोन चारचे डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अशा फरार आरोपींना पकडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आरएके मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमुद कदम यांनी सहायक निरीक्षक महेश लामखडे यांना जडेजाचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. कॉन्स्टेबल नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, विद्या यादव आणि सुशांत बनकर लामखडे यांच्या टीममध्ये होते. या संपूर्ण टीमनं जडेजा काम करत असलेल्या हिंदमाता मार्केटमध्ये चौकशी सुरू केली.
हेही वाचा : तीन वर्षांचा थकीत पगार, शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेने दुचाकीवरुन मारली उडी
सहायक निरीक्षक लामखडे यांनी सांगितलं, "हिंदमाता येथील सेल्समनची चौकशी करताना, आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली. जडेजा हा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील असून, त्यानं सोन्याचे दात बसवलेले असल्याचं समजलं. पण, एवढ्याचा माहितीच्या आधारे संपूर्ण जिल्ह्यातून एका व्यक्तीचा माग काढणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं. त्यामुळे आम्ही वेगळी रणनीती आखण्याचा विचार केला."
पोलीस दुकानातील जडेजाच्या माजी सहकाऱ्यांच्या संपर्कात राहिले आणि त्यांनी जडेजा वापरत असलेला फोन नंबर मिळवला. एका अधिकाऱ्यानं या नंबरवर फोन केला असता त्यानं तो प्रवीण जडेजा नसून, प्रदीपसिंग असल्याचा दावा केला आणि फोन बंद केला.
"तो हुशार होता आणि अनोळखी लोकांशी फोनवर बोलत नव्हता. त्यामुळे आम्ही त्याला पॉलिसी मॅच्युरिटी रकमेचं आमिष दाखविण्याचं ठरवलं. कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी पैसे घेण्यासाठी त्याला मुंबईत येण्यास सांगितलं. आम्ही 1 फेब्रुवारी रोजी त्याच्या एका मित्राला त्याचं नाव आणि अस्पष्ट पत्ता असलेला एक मेसेज पाठवला होता. त्यात म्हटलं होतं की, त्याला 25 हजार रुपयांच्या रकमेसाठी क्लेम करायचा आहे. आम्ही त्या मेसेजमध्ये विमा एजंट म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोन नंबरही दिला होता. आम्ही पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रोफाइल फोटोच्या जागी विमा कंपनीचा फोटो लावला आणि त्याचं स्टेटस इमेज म्हणून विविध पॉलिसी योजना अपलोड करत राहिलो," असं लामखडे यांनी सांगितलं.
"मित्राकडून फॉरवर्ड मेसेज मिळालेल्या जडेजानं काही दिवस पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रोफाइलची स्थिती तपासली. तो खरा एजंट असल्याची खात्री पटल्यानं शेवटी त्याला फोन करून त्यानं विम्याविषयी चौकशी केली. पोलीस कॉन्स्टेबलनं उत्तर दिलं की, त्याच्या पूर्वीच्या मालकानं कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला होता. त्यानंतर जडेजा मुंबईत आला आणि आम्ही त्याला गुरुवारी (9 फेब्रुवारी) पकडलं," असंही लामखडे यांनी सांगितलं. चौकशीदरम्यान जडेजाने सुरुवातीला आपण प्रदीप सिंग नावाची व्यक्ती असल्याचं ठासून सांगितलं. पण, जेव्हा त्याला त्याच्या सोन्याच्या दातांचा उल्लेख असलेल्या न्यायालयातील नोंदी दाखविण्यात आल्या तेव्हा त्यानं गुन्हा कबुल केला.
Keywords -
Link - https://www.mid-day.com/mumbai/mumbai-crime-news/article/mumbai-cops-hoodwink-and-trap-man-absconding-for-16-years-23269877
वृषाली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police