मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या दाम्पत्याचं 1 वर्षाचं मूल चोरीला, पोलिसांनी 2 तासांतच आरोपींना केली अटक

मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या दाम्पत्याचं 1 वर्षाचं मूल चोरीला, पोलिसांनी 2 तासांतच आरोपींना केली अटक

मुलीची अवघ्या 2 तासांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे.

  • Share this:

ठाणे, 3 नोव्हेंबर : अपहरण झालेल्या 1 वर्षांच्या मुलीची अवघ्या 2 तासांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या चारकोर पोलिसांनी ही कामगिरी केली असून मुलं चोरुन ती मुलं विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्यांचा यामुळे पर्दाफाश झाला आहे.

चारकोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका फुटपाथवर घरकाम करणारे जोडपे आपल्या एक वर्षाच्या मुलीसोबत झोपले होते. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली तेव्हा तिच्या बाजूला तिची 1 वर्षांची मुलगी नव्हती. त्यांनी खूप शोध घेतला पण ती कुठेच दिसून आली नाही. शेवटी त्यांनी सकाळी चारकोप पोलीस स्टेशन येथे धाव घेतली.

या प्रकरणाची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी तात्काळ 3 टीम तयार केल्या आणि तपास करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना त्यांच्या खबरी मार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शोध घेतला आणि सीसीटीव्ही तपासले असता अंधेरी येथे ही लहान मुलगी एका जोडप्याकडे दिसून आली. पोलिसांनी तात्काळ त्या भागात तपास केला आणि त्यांनी रश्मी पवार व राजू पवार या जोडप्याला मुलीसह ताब्यात घेतले.

एवढेच नाही तर त्यांनी त्या 1 वर्षांच्या मुलीचा ज्या जोडप्याशी 15 हजार रुपयांत व्यवहार केला होता त्या सचिन येवले आणि सुप्रिया येवले या दाम्पत्यालाही अटक केली. येवले दाम्पत्याला गेली 15 वर्षे मुल नाही. लग्न झाल्यापासून त्यांना मुलच झाले नाही. त्या कारणाने त्यांनी पवार दाम्पत्याकडे याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार पवार दाम्पत्याने चारकोप येथून या 1 वर्षाच्या मुलीला चोरुन येवले दाम्पत्याला विकले होते. पण पोलिसांनी वेळीच आपल्या तपासाचे चक्र फिरवले आणि त्या 1 वर्षाच्या मुलीला अपहरण कर्त्यांच्या ताब्यातून सोडवलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 3, 2020, 6:50 PM IST

ताज्या बातम्या