मुंबई, 24ऑक्टोबर: आईसारखं प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही नाही असं म्हटलं जातं. पण मुंबईत राहणाऱ्या एका महिलेनं आई या शब्दालाच काळीमा फासला आहे. मुलीने ऑनलाईन वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून एका आईने आपल्याच पोटच्या मुलीला पेन्सिलने भोसकलं आहे. या घटनेमध्ये सहावीत शिकणारी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या आईविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. ऑनलाईन अभ्यास सुरू असताना संबंधित मुलीला शिक्षकांनी प्रश्न विचारले या प्रश्नाचं उत्तर मुलीला देता आलं नाही. याचा तिच्या आईला प्रचंड राग आला आणि तिने स्वत:च्याच मुलीच्या पाठीवर जवळच असलेल्या पेन्सिलने हल्ला केला. यामध्ये मुलीला गंभीर जखम झाली आहे. हा सगळा प्रकार मुलीच्या बहिणीने बघितला आणि चाईल्ड हेल्पलाईनला फोन केला. बुधवारी हा सगळा प्रकार घडला आहे.
या सर्व घटनेची माहिती मिळताच एक स्वयंसेवी संस्था मुलीच्या मदतीसाठी धावून आली आहे. या मुलीची ते शक्य तितकी मदत करणार आहेत. याघटनेबाबत मुलीच्या आईला विचारलं असता तिने कोणतीही ठोस माहिती दिली नाही. हल्ला करणाऱ्या आईविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अशा आईविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या शाळा बंद असल्यामुळे मुलं पूर्ण वेळ घरीच असतात. यामुळे पालकांची चीडचीड वाढल्याचं दिसून येत आहे.