झाशी, 30 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्महत्या, बलात्कार, तसेच हत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता सध्या उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एका 26 वर्षीय विवाहितेचं मृत्यूप्रकरण सध्या गाजत आहे. आराध्या विवेक यादव असं या मृत महिलेचं नाव आहे. आराध्याचा मृत्यू छतावरून पडून झाल्याचं तिच्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे. तर, सासरच्या मंडळींनी आराध्याला छतावरून ढकलून तिची हत्या केली, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय. या प्रकरणी आराध्याची सासरची मंडळी आणि तिचे आई-वडिल आमने-सामने आलेत. त्यामुळे आता या मृत्यूचं गूढ लवकरातलवकर उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
झाशी जिल्ह्यातील सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्रा चौकातील हे प्रकरण आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आराध्याचा विवाह विवेक यादव नावाच्या व्यक्तीशी 2016 मध्ये झाला होता. लग्नाच्या सात वर्षानंतर आराध्याचा अचानक मृत्यू झाला.
याबाबतची माहिती पोलिसांना देताना विवेक यादव याने सांगितलं की, ‘पत्नी आराध्या काही कामानिमित्त गच्चीवर गेली होती. त्यानंतर अचानक ती छतावरून खाली पडली, व त्यात तिचा मृत्यू झाला.’ आराध्याच्या मृत्यूची माहिती मिळताच सिपरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
सासरच्या मंडळीवर केला हत्येचा आरोप -
आराध्याच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या माहेरची मंडळी ग्वाल्हेरहून झाशीला आली. त्यानंतर आराध्याच्या आई-वडिलांनी विवेक यादव आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी हत्येचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की, ‘अनेक दिवसांपासून सासरची मंडळी आराध्यावर हुंड्यासाठी दबाव आणत होती. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यानं तिला छतावरून खाली फेकण्यात आलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.’ आराध्याच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे की, ‘विवेक बेरोजगार असताना दोघांनी लग्न केलं होतं. दुसरीकडे विवेकला त्याच्या वडिलांच्या निधनानंतर नोकरी लागली होती. त्यानंतर तो सातत्यानं आराध्याकडे हुंड्याची मागणी करत होता. अनेकवेळा त्याने हुंड्यासाठी आराध्याला मारहाणही केली होती.’
हेही वाचा - गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणात 50 लाखांची मर्सिडीज जळून खाक, तरुणाने डोक्याला लावला हात
खून की अपघात? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांचं म्हणणं आहे की, ‘ आराध्याच्या मृत्यू प्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मृताच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल.’
दरम्यान, या घटनेची सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चर्चा सुरू आहे. आराध्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18