बीड, 27 डिसेंबर : बीडमध्ये वाळू माफियांचा (Sand Mafia) प्रचंड हैदोस सुरु आहे. हे वाळू माफिया इतके शिफारले आहेत की ते वाळू चोरी (theft sand) करतातच, त्याशिवाय ते वाळूने भरलेले ट्रॅक्टर (Tractor) इतक्या वेगाने चालवतात की ते रस्त्याने चालवणाऱ्या सर्वसामान्यांना काहीच समजत नाहीत. त्यांच्या ट्रॅक्टर चालकांची मजल इतकी वाढलीय की ते चक्क किड्या-मुंग्यांसारखं सर्वसामान्यांना चिरडण्यासही मागेपुढे बघत नाहीत. अशीच एक घटना गेवराई (Gevrai) तालुक्यात आज घडली आहे. वाळू माफियांच्या भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यात याआधी 8 जणांचा अशाचप्रकारे बळी गेला आहे. त्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू माफियाच्या भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय. अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या वाहतूकीने बळी घेतल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. या अपघातात 42 वर्षीय तुकाराम बाबूराव निंबाळकर यांचा मृ्त्यू झाला आहे. या अगोदर गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे 8 जणांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे ही अवैध वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी आज रास्ता रोको करत ठिय्या केला. तसेच मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून देखील नातेवाईक आक्रमक झाले. संबंधित परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा : पुण्यात पोलीस आणि गुंडांमध्ये सिनेस्टाईल झटापट, आयुक्तांनी जीवाची पर्वा न करता आरोपींच्या मुसक्या आवळल्या
नेमकं काय घडलं?
तुकाराम निंबाळकर हे आपल्या दुचाकीने गेवराईकडे येत असताना अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी महामार्गावरच ठिय्या मांडून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत महामार्गावरुन उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस कारवाई करणार?
गेवराई तालुक्यातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा करुन त्याची वाहतूक केली जातेय. ही वाहतूक महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरु आहे. त्यामुळे वाळू माफिया रस्त्यावरील नागरिकांना उडविण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. विशेष म्हणजे आजच्या घटनेतील मृत्यू हा तालुक्यातील 9 वा बळी आहे. यानंतर देखील अशा घटना सातत्याने सुरु आहेत. याविरोधात जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. तसेच याबाबत कठोर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी देखील नागरीक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.