बीड, 18 नोव्हेंबर : दोन महिन्यांपासून माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कत्तीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील बोधेगाव येथे उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी धनराज ऊर्फ योगीराज सोनवर (वय 27) असं मयत माहिलेचं नाव आहे.
परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह केज तालुक्यातील होळ येथील धनराज यांच्यासोबत सहा वर्षांपूर्वी झाला होता. सुखाने सुरू असलेल्या संसारात मीठाचा खडा पडला आणि संशयाचे भूत डोक्यात घेवून बसलेल्या धनराजने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
दोन महिन्यापूर्वी ज्ञानेश्वरीचा औरंगाबादमध्ये पडून पाय मोडला होता. त्यामुळे ती दोन महिन्यापासून बोधेगाव येथे माहेरी राहत होती. तू गेल्या दोन महिन्यांपासून नांदायला का येत नाहीस, असे विचारत पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातात असलेल्या कत्तीने ज्ञानेश्वरीच्या गळ्यावर व मानेवर वार करून तिला ठार मारले.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धनराज योगीराज सोनवर याच्या विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 302, 452, 504 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे हे तपास करत आहेत.