मुंबई, 17 मार्च: चहामध्ये गुंगीचं औषध टाकून (mixing drugs in tea) प्रवाशांच्या मौल्यवान वस्तुंवर डल्ला (Theft in railway station) मारणाऱ्या अट्टल भामट्याला बांद्रा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी युवक प्रवाशांच्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकायचा, त्यानंतर ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या मौल्यवान वस्तूंवर हात साफ करायचा. या प्रकरणात अटक केलेल्या युवकाचं नाव हमीद खान असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 13 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत असून अनेक चोरीच्या घटनेची प्रकरणं उघड होण्याची शक्यता आहे.
आरोपी युवकाने 9 मार्च रोजी दीपक शर्मा नावाचा एक प्रवाशाला लुटलं आहे. दीपक शर्मा हे बांद्रा येथून राजस्थानातील बिकानेरला जात होते. यावेळी ते बांद्रा टर्मिनल्सच्या स्टेशनवर वेटिंग रूममध्ये ट्रेनच्या प्रतीक्षेत बसले होते. यावेळी आरोपी हमीद खानने त्यांना पाहिलं आणि विचारलं की तुम्ही कुठे जात आहात. काही वेळ गप्पा मारल्यानंतर आरोपी तरुणाने दीपक शर्मा यांच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर आरोपी हमीदने दीपकला चहा पिण्याचा आग्रह केला. यावेळी दोघंही चहा पिण्यासाठी बाहेर गेले. चहा पित असताना, हमीदनं चतुराईनं दीपक शर्माच्या चहामध्ये गुंगीचं औषध मिसळलं. हा चहा प्यायल्यानंतर शर्मा बेशुद्ध झाले. यावेळी संधी साधून आरोपी हमीदने दीपकच्या सर्व मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
यावेळी बांद्रा टर्मिनसवर तैनात असलेल्या पोलिसांना शर्मा बेशुद्ध अवस्थेत आढळले असता त्यांनी शर्मा यांना भाभा रुग्णालयात दाखल केलं. थोड्या वेळाने जेव्हा शर्मा यांना शुद्ध आली, तेव्हा त्याने पोलिसांना त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर रेल्वे पोलिसांनी स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि कुर्ला येथील रहिवासी असलेल्या हमीद खानला अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 13 मोबाइल फोन आणि 2 लाख 8 हजार रुपयांच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत. तसंच अमली पदार्थांच्या 20 गोळ्या आणि 5 ते 10 गोळ्यांची पावडर देखील जप्त करण्यात आली आहे.
(वाचा-मुंबई हादरली! मैत्री तोडली म्हणून तरुणाने युवतीसह तिच्या आईवर चाकूने केले वार)
बांद्रा रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितलं की, प्रवासी दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनंतर आम्ही रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज शोधलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला आरोपी आढळला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर आरोपीला कुर्ला भागातून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींविरूद्ध अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Theft