Home /News /crime /

अ‍ॅमेझॉनवरुन Online विष मागवलेल्या तरुणाचा मृत्यू; आई-वडिलांनी उचललं हे पाऊल

अ‍ॅमेझॉनवरुन Online विष मागवलेल्या तरुणाचा मृत्यू; आई-वडिलांनी उचललं हे पाऊल

आपल्या मुलाला विषाची ऑनलाइन डिलिव्हरी अ‍ॅमेझॉननं केली होती. त्यामुळं आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी कंपनीच जबाबदार आहे, असा आरोप आदित्यच्या पालकांनी केला आहे.

    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : आजकाल ऑनलाइन शॉपिंगची (Online Shopping) सवय सगळयांनाच झाली आहे. आकर्षक सवलती, हवी ती वस्तू मिळण्याची सोय आणि घरबसल्या शॉपिंगची सुविधा यामुळे तरुणाईत तर ऑनलाइन शॉपिंग अतिशय लोकप्रिय आहे. सध्याच्या काळात तर ही सोय चांगलीच उपयुक्त ठरत आहे. मात्र ही सोय एका गरीब कुटुंबाला भलतीच महागात पडली असून, त्यांना आपला तरुण मुलगा गमवावा लागला आहे. ऑनलाइन कंपन्यांची हवी ती वस्तू उपलब्ध करून देण्याची सोय एका तरुणाच्या मृत्यूला (Death of Youngster) कारणीभूत ठरली आहे. यामुळे ऑनलाइन कंपन्यांच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या तरुणाच्या पालकांनी अ‍ॅमेझॉन कंपनीवर (Amazon) हत्येचा आरोप करत, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूर (Indore) इथली ही घटना आहे. छत्रीपुरा पोलीस स्टेशन परिसरातील लोढा कॉलनीत फळ विक्रीचा व्यवसाय करणारे रंजीत वर्मा आपली पत्नी आणि मुलगा आदित्य (Aditya Varma) यांच्यासह भाड्याच्या घरात राहतात. 18 वर्षांच्या आदित्यनं विष प्राशन करून आत्महत्या केली. 29 जुलै रोजी आदित्यनं विष घेतलं आणि तो घरातच झोपून राहिला. त्याची प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला चोईथराम रुग्णालयात दाखल केलं. तिथं दुसऱ्या दिवशी 30 जुलै रोजी सकाळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर, छत्रीपुरा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आदित्यचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात आदित्यचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचं उघड झालं. नवभारत टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुंब्रा खाडीत ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या? दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर आदित्यच्या वडिलांनी त्याचा मोबाईल बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या मुलानं जे विष घेतलं आहे ते अ‍ॅमेझॉनवरून (Amazon Delivered Poison) आलं होतं. आदित्यने अ‍ॅमेझॉनवरून 20 जुलैच्या आसपास प्रथम सल्फास (Sulphas) नामक विषारी पावडर मागवली होती. मात्र 22 तारखेला त्यानं ही ऑर्डर रद्द केली. त्यानंतर आदित्यनं पुन्हा ही ऑर्डर दिली आणि 28 जुलै रोजी सल्फास त्याच्याकडं पोहोचलं. आदित्यच्या सामानाची झडती घेतली असता त्यात हे सल्फास पावडरचे पॅकेटही सापडले. त्यामुळं आदित्यच्या पालकांनी अ‍ॅमेझॉन कंपनीवर हत्येचा गंभीर आरोप केला असून, छत्रीपुरा पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलाला विषाची ऑनलाइन डिलिव्हरी अ‍ॅमेझॉननं केली होती. त्यामुळं आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी कंपनीच जबाबदार आहे, असा आरोप आदित्यच्या पालकांनी केला आहे. कंपनीविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकल शॉपमध्ये कफ सिरपदेखील मिळत नाही, मग अशा वस्तू या कंपन्या कशा विकतात. अशा गोष्टी विकण्यासंबंधी कायदेशीर तरतुदी आहेत, मग कंपनी अशाप्रकारे उघडपणे विष कसं विकू शकते, असा सवाल त्यांनी केला आहे. आपण आपला मुलगा गमावला आहे, परंतु भविष्यात हे कोणासोबतही होऊ नये यासाठी अ‍ॅमेझॉन कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हे वेळीच थांबवले नाही तर अशा घटनांना लगाम घालणे कठीण होईल, असं आदित्यच्या वडिलांनी म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या