लखनौ, 29 ऑगस्ट : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथे दिवसभर चर्चा असलेल्या दुहेरी खुनाचा खळबळजनक खुलासा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून जवळच असणाऱ्या एका उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्याच्या घरात ही खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. काही तासांतच उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आणि खळबळजनक खुलासा केला. अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीनेच आईचा आणि भावाचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या सरकारी वसाहतीच्या वस्तीत भर दिवसा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीचा आणि तरुण मुलाचा खून झाला. ही घटना घडली तेव्हा मुलगीसुद्धा घरात होती, पण तिला कुठलीही इजा झालेली नाही. त्यामुळे संशयाची सुई मुलीवरच होती.
Indian Railways चे वरिष्ठ अधिकारी असलेल्या राजेश दत्त वाजपेयी यांच्या घरात ही घटना घडली. वाजपेयी सध्या दिल्लीत पोस्टिंगला आहेत. लखनौच्या त्यांच्या घरात पत्नी आणि दोन मुलं राहात होती.
वाजपेयी यांची 49 वर्षांची पत्नी आणि 20 वर्षांच्या मुलावर गोळ्या घातल्या गेल्या. या वेळी मुलगी घरात होती. तिनेच हा प्रकार नोकराच्या कानावर घातला आणि नोकराने पोलिसांना कळवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पण या प्रकरणी मुलीवरच संशय असल्याने तिला ताब्यात घेतलं.
पोलिसांना तपासात घरातल्या आरशावरही गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसल्या. त्यावर Disqualified Human असं लिहिलेलं आढळलं.
राजेश दत्त वाजपेयी यांची मुलगी शूटर आहे. तिने नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकते. ती काही दिवस नैराश्यात असल्याचं समजते. ती घरात असताना या दोन हत्या झाल्या. तसंच पोलीस तपासात घरात कुणी जबरदस्तीनं घुसलं असेल अशा कुठल्याही खुणा दिसलेल्या नाहीत. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तेव्हा तिने गुन्हा कबूल केला.
ही मुलगी डिप्रेशनमध्ये असल्याचं समजतं. तिनेच आई आणि भावावर गोळ्या चालवल्या आणि नंतर आरशात स्वतःच्या प्रतिमेवरही गोळ्या घातल्या. मी एक नालायक व्यक्ती आहे, असं तिनेच आरशावर लिहून ठेवलं होतं. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अजून समजलेलं नाही.
या रेल्वे अधिकाऱ्याचं घर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे. घटनेची माहिती कळल्यास पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी तातडीने घटनास्थळी पोहोचले. ज्या घरात हे दोन खून झाले, तो परिसर कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी ओळखला जातो. या घराकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्हीची निगराणी आहे. असं असतानाही लखनौच्या सर्वांत सुरक्षित मानल्या गेलेल्या भागातच दुहेरी खून झाल्याने खळबळ उडाली. माध्यम प्रतिनिधी आणि बघ्यांची गर्दी या ठिकाणी जमली आहे. विरोधी पक्षांनीही राज्यातल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर बोट ठेवलं.