नागपूर, 22 ऑक्टोबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील पाचपावली भागात 2 तरुणांनी पेट्रोल टाकुन फॉर्च्युनर कार जाळण्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
20 ऑक्टोबरची ही घटना आहे. नागपूरच्या पाचपावली भागामध्ये राहणारे सतीश ठाकूर यांनी नेहमीप्रमाणे आपली फॉर्च्युनर कार घरासमोर उभी केली होती.
मध्यरात्री अंधारात दोन अज्ञात तरुण हे दुचाकीवरून आले. दोघेही जण गाडीच्या बाजूला उभे राहिले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने गाडीच्या बोनेटवर पेट्रोल ओतले. त्यानंतर आगपेटीने आग लावली. आग लागल्यानंतर दोन्ही तरुण घटनास्थळावरून पळून गेले. दोन्ही तरुणांनी तोंडला रुमाल बांधलेला होता.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सतीश ठाकूर यांनी याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसंच ठाकूर यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या आधारावर पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे.
कारने दुचाकीस्वाराला दिली धडक, महिन्याभरानंतर झाली कारचालकाला अटक
दरम्यान, पुण्यातील विश्रांतवाडी भागात महिन्याभरापूर्वी अनिल शहा यांच्या दुचाकीला एका भरधाव कारने धडक दिली होती. अनिल शहा हे एका चौकातून जात होते. त्याच वेळी एका भरधाव हुंदई असेंट कारने अनिल शहा यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, अनिल शहा हे हवेत फेकले गेले होते. एवढंच नाहीतर कारच्या धडकेनं खाली कोसळल्यानंतरही कार थांबली नाही. त्याने पायावरून कार तशीच पळवून नेली. भरचौकात ही घटना घडली होती. चौकात असलेल्या एका घरावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. अखेर महिन्यभराच्या तपासानंतर कारचालकाचा पत्ता मिळाला. सागर चव्हाण असं या कारचालकाचे नाव होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी सागर चव्हाणची गाडीसुद्धा ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.