मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कानशिलात लगावल्याचा राग अन् बापलेकाने रचला कट; तळेगावमधील घटनेला वेगळं वळण

कानशिलात लगावल्याचा राग अन् बापलेकाने रचला कट; तळेगावमधील घटनेला वेगळं वळण

बापलेकाने रचला कट

बापलेकाने रचला कट

काही दिवसांपूर्वी मृत किशोर आवारे आणि आरोपीत खडाजंगी झाली होती. याच घटनेचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचं समोर आलं आहे.

गणेश दुडम, प्रतिनिधी

मावळ, 23 मे : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. किशोर आवारे यांची 12 मे रोजी निर्घृण हत्या झाली होती. या हत्येत त्यांच्याच समितीचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचाही हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मृताने आरोपीच्या कानशिलात लगावली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

मुलगा गौरव खळदे आणि इतर आरोपींनी तशी कबुली दिली आहे. त्यानुसार आता भानू खळदे यांनाही आरोपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भानू खळदे सध्या फरार झाले असून दोन पथकं त्यांचा शोध घेत आहेत. भानू खळदे आणि किशोर आवरेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी झाली होती. त्यावेळी आवरेंनी खळदेंच्या कानशिलात लगावली होती. जुन्या नगरपरिषदेत सर्वांदेखत झालेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी खळदे बाप लेकाने कट रचला. 12 मे ला सध्या कामकाज सुरू असलेल्या नगरपरिषद कार्यालयासमोरच निर्घृण हत्या करण्यात आली.

वाचा - प्रेमविवाहानंतर मुलीचा जन्‍म; बापाने पैशांसाठी 15 वर्षांच्या मुलीला विकले, कला केंद्रात चौघांनी.. 9 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांना चोवीस तासांत बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी गौरवला अटक केल्यानंतर पुढील चौकशीत वडील भानू खळदेंचाही या हत्येत हात असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भानू खळदेंना आरोपी केलं असून त्यांचा शोध घेतला जातोय. भानू खळदे पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर किशोर आवारे हत्येतील अनेक कंगोरे समोर येतील.

तपास अधिकाऱ्याची बदली

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची 12 मे रोजी भर दिवसा हत्या करण्यात आली. या प्रकारचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख होत्या. त्यांची आता चंद्रपूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार, याची चर्चा सध्या मावळमध्ये सुरु आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Pune