मुंबई, 07 फेब्रुवारी : चार्ल्स शोभराज हे नाव अनेकांनी ऐकलेलं असेल किंवा त्याबद्दल वाचलंही असेल. 1970च्या दशकात संपूर्ण आशिया खंडामध्ये त्यानं आपली दहशत निर्माण केली होती. फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजनं अनेक खून केले होते. याच खुन्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. ही बाब सिद्ध करणारी एक घटना दिल्ली पोलिसांनी उघड केली आहे. दिल्ली पोलिसांनी बलेनो कारची बनावट नंबर प्लेट आणि वाहनातल्या रक्ताच्या खुणा यांच्या आधाराने खुनाच्या एका घटनेचा तपास केला आहे. या प्रकरणी दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी 10 महिन्यांपूर्वी एका 40 वर्षीय महिलेची हत्या केली होती.
शाकीर अली (50) आणि मोहम्मद फैज (22), अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांनी सुशीलावती नावाच्या महिलेचा खून केल्याचा आरोप आहे. ईशान्य दिल्लीतल्या दयालपूरच्या रहिवासी सुशीलावती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस कर्मचार्यांना असा संशय होता, की ती स्वत:च दुसऱ्या शहरात पळून गेली आहे. कारण, पोलिसांना तिचा मृतदेह सापडला नव्हता; मात्र तिच्या घरापासून 80 किलोमीटर अंतरावर बुलंदशहरमध्ये तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं पुढच्या तपासात आढळलं.
हेही वाचा : मुंबईच्या रिक्षेत 22 लाखांची जबरी चोरी, पोलिसांनी फिल्मी स्टाईल आवळल्या मुसक्या!
दोन्ही आरोपी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होते. 16 जानेवारी रोजी ते कश्मीरे गेट मेट्रो स्थानकाच्या दिशेनं जात असताना एका पोलीस खबऱ्याला त्यांची कार दिसली. "आमच्या सूत्रांनी आम्हाला सांगितलं की, हे पुरुष चोर आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे होती. आम्ही तिथे एक टीम पाठवली. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दोघांपैकी एक अली हा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहे," अशी माहिती तपास टीमचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्यानं दिली.
सुरुवातीला अली आणि फैज त्यांच्याकडच्या शस्त्राबाबत खोटं बोलले; पण पोलीस त्यांना चोरीची कार आणि बनावट नंबर प्लेटबद्दल सतत विचारत राहिले. डीसीपी (उत्तर) सागर सिंग कलसी आणि एसीपी धर्मेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या तपास पथकाला आरोपींच्या कारमध्ये रक्ताचे ठिपकेही आढळले. डीसीपी कलसी म्हणाले, की तापसात आढळलं की ही कार अलीची आहे; पण तो गाडीचे हप्ते भरण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने कार चोरीची खोटी तक्रार दाखल केली. वसुली एजंटची दिशाभूल करण्यासाठी त्यानं नंबर प्लेटही बदलली.
"अलीनं तयार केलेली स्वत:ची खोटी ओळख हा या खटल्यातल्या मुख्य पुराव्यांपैकी एक आहे. तो एक प्रॉपर्टी ब्रोकर आहे. सीरियल किलर चार्ल्स शोभराजबद्दल पाहिलेल्या चित्रपटापासून त्यानं प्रेरणा घेतलेली आहे. आर्थिक फायद्यासाठी तो महिलांना भेटून त्यांची फसवणूक करत होता. यासाठी त्याला नवीन नावाची गरज होती. त्यानं राजेश नावानं बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि बनावट बँक खातं तयार केलं. त्याने या आयडींचा वापर भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी केला होता," असं डीसीपी कलसी यांनी सांगितलं.
अलीची पुन्हा चौकशी केली असता असं आढळलं, की त्यानं सुशीलावती यांची आमिष दाखवून फसवणूक केली होती. त्यांची हत्या करण्यापूर्वी आरोपीनं सुशीलावतींचं डीएलएफ गाझियाबादमधलं घर बळकावलं होतं.
पोलिसांनी सांगितलं की, अली आणि फैज यांनी गेल्या वर्षी 3 मार्च रोजी सुशीलावती यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पीडितेच्या कुटुंबातल्या सदस्याने दिलेल्या नमुन्याशीही कारमधल्या रक्ताचे नमुने जुळले आहेत.
Keywords -
Link - https://indianexpress.com/article/cities/delhi/how-a-charles-sobhraj-inspired-killer-almost-got-away-with-murder-8428059/
वृषाली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime