तिरुवनंतपुरम, 28 डिसेंबर : संपूर्ण घरात ख्रिसमसच्या (Christmas) निमित्तानं उत्सवाचं वातावरण होतं. हा आनंद साजरा करण्यासाठी घरामध्ये आकर्षक लाइटिंग करण्यात आली होती. त्याचवेळी नवऱ्यानं जुना भांडणांचा राग काढत बायकोची इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केली. आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीचा करंट लागून मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. अखेर पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
केरळच्या (Kerala) तिरुवनंतपुरममधल्या (Thiruvananthapuram) कारकोणम भागामध्ये 51 वर्षांच्या शाखाकुमारी त्यांचा 28 वर्षांचा नवरा अरुण सोबत राहत होत्या. अरुणनं संपूर्ण घरात ख्रिसमच्या निमित्तानं महागडे लाइटिंग केले होते. निमित्त ख्रिसमसचं असलं तरी त्याचा खरा हेतू वेगळाच होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणनं इलेक्ट्रिक शॉक दिल्यानंतर संशय येऊ नये म्हणून पत्नीला हॉस्पिटलमध्येही दाखल केले. हॉस्पिटलमध्ये उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हत्येचं कारण काय?
या जोडप्यानं काही महिन्यांपूर्वीच लग्न केले होते. लग्नानंतर लगेच अरुणनं घटस्फोटाची मागणी करत होता. अरुणची मागणी शाखाकुमारी यांना मान्य नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. बायकोची संपत्ती हडप करण्याचा अरुणचा प्रयत्न होता अशी माहिती देखील आता समोर आली आहे. त्याने यापूर्वीही बायकोला इलेक्ट्रीक शॉक देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
कसा झाला हत्येचा उलगडा?
पोलिसांनी घराची तपासणी केल्यानंतर त्यांना काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसले. ते डाग पाहून शाखाकुमारींची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. अरुणच्या कठोर उलटतपासणीनंतर त्यानं हत्येची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात अरुणवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kerala, Murder