धक्कादायक! जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्लं, पाच जणांना अटक

धक्कादायक! जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्लं, पाच जणांना अटक

घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला जवळपास 50 किलो वजनाचा एक बिबट्या (Leopard) अडकला होता.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी :  घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला जवळपास 50 किलो वजनाचा एक बिबट्या (Leopard) अडकला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्याच्याऐवजी लोकांनी त्या बिबट्याला ठार केलं आणि त्यानंतर त्याचं मांस शिजवून खाल्लं. या धक्कादायक प्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

केरळमधील (Kerala) इडुकीमधील हा सर्व प्रकार आहे. या प्रकरणात वन विभागानं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या पाचही आरोपींची ओळख पटली आहे. विनोद, कुरिकोस, बीनू,  कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावं आहेत. यामधील विनोदच्या शेतामधील जाळ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वांना बोलावून बिबट्याला ठार मारलं आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं.

वन विभागाला या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विनोदच्या घरात धाड टाकली. विनोदच्या घरातून 10 किलो मांस आणि बिबट्याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. बिबट्याची नखं, दात आणि कातडं विकण्याची या सर्व आरोपींची योजना होती.

या प्रकरणातल्या आरोपींचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यांनी अटकेनंतर या सर्व प्रकारची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे. वन विभागच्या कायद्यानुसार या आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. संरक्षित वन्य प्राण्यांची अवैध पद्धतीनं शिकार करुन त्याची परदेशामध्येही तस्करी केली जाते.

या सर्व प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. केरळमधल्या इडुकीमधील जंगलातून बिबट्या जवळपासच्या परिसरात तसंच शेतामध्ये येण्याच्या घटना वारंवार घडतात. अनेकदा पिण्याचं पाणी पिण्याच्या उद्देशानं बिबट्या गावातील तळ्याजवळ येतो, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 24, 2021, 11:49 AM IST

ताज्या बातम्या