नवी दिल्ली, 13 जानेवारी : कंझावला अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी घटनेच्या वेळी रोहिणी जिल्ह्यातील चौकीत पीसीआर व्हॅनमध्ये ड्युटीवर असलेल्या 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कंझावाला प्रकरणात, गृह मंत्रालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना तीन पीसीआर व्हॅन आणि दोन पिकेटमधील ड्युटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. एवढेच नाही तर, गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना पीसीआर व्हॅन, चेक पोस्टच्या पर्यवेक्षक अधिकार्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष आयुक्त शालिनी सिंह यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दिल्ली पोलिसांना लवकर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले
त्या रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून दोषींना शिक्षा करता येईल. तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि तपासाच्या प्रगतीबाबत पाक्षिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी देखील कारवाई केली पाहिजे जेणेकरून लोक, विशेषतः महिला आणि मुले भयमुक्त वातावरणात जगू शकतील.
वाचा - रात्रीच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणं पडलं महागात; रील्स बनवणाऱ्या युवकांसोबत...
काय प्रकरण आहे?
दिल्लीतील कंझावाला येथे 31 डिसेंबरच्या पहाटे एका तरुणीचा मृतदेह विवस्त्र आढळून आला. शरीराचे अनेक भाग छिन्नविछिन्न झाले होते. पोलिसांचा दावा आहे की, कारमध्ये आलेल्या 5 तरुणांनी एका तरुणीला धडक दिली, त्यानंतर तिला 10 ते 12 किमीपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतदेह मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास केला असता, पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक स्कूटीही पडली होती, जी अपघातग्रस्त होती. स्कूटीच्या क्रमांकाच्या आधारे तरुणीची ओळख पटली.
या प्रकरणात सुलतानपुरी पोलीस ठाण्यात दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), क्रिशन (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हेगारी कट रचणे, निर्दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मृत्यू झाल्याचे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. नंतर आरोपींना संरक्षण दिल्याबद्दल आशुतोष आणि अंकुश खन्ना या आणखी दोन लोकांना अटक करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.