15 वर्षांच्या मुलीने हिमतीने केला बालविवाहाला विरोध, आई-वडिलांची थेट केली तक्रार

15 वर्षांच्या मुलीने हिमतीने केला बालविवाहाला विरोध, आई-वडिलांची थेट केली तक्रार

एका चिमुरडीने स्वत:च्या लग्नाला ठाम विरोध केला. त्याचबरोबर जिल्हा बाल कल्याण समितीकडं याची तक्रार देखील केली.

  • Share this:

गुमला (झारखंड), 25 जानेवारी :  आपल्या देशात बालविवाह (Child Marriage) हा कायद्यानं गुन्हा आहे. त्याचबरोबर ही प्रथा रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती अभियान चालवले जाते. या विषयावर सरकारी पातळीवरील प्रचार आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यामुळे बालविवाहाचं प्रमाण कमी झालं आहे, मात्र पूर्णपणे संपलेलं नाही. आजही ही अनिष्ट प्रथा सुरुच आहे. अनेकदा आई-वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या दबावामुळे मुलींना त्यांच्या सर्व इच्छा मारुन बालविवाह करावा लागतो.

मुलीनंच केला विरोध!

झारखंडमधील (Jharkhand) गुमला जिल्ह्यातल्या (Gumla District)  एका मुलीनं स्वत:च्या लग्नाला ठाम विरोध केला. त्याचबरोबर जिल्हा बाल कल्याण समितीकडं याची तक्रार देखील केली. सुलेखा कुमारी (Sulekha Kumari) असं या 15 वर्षाच्या शूर मुलीचं नाव आहे. तिनं हे धाडस दाखवून एक नवा पायंडा पाडला आहे.

काय आहे प्रकरण?

गुमला जिल्ह्यातील पालाकोट गावातील कस्तुरबा विद्यालयात सुलेखा नववीच्या वर्गात शिकते. तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न 26 वर्षांच्या तरुणाशी नक्की केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात हे लग्न होणार होतं. सुलेखानं आपल्या आई-वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्याचा काही उपयोग झाला नाही. लग्नाला नकार दिल्यास तिला मारहाण करण्याची धमकी घरातल्या लोकांनी दिली. त्यामुळे अखेर गुरुवारी सुलेखा घरातून पळून गेली.

BDO कडं तक्रार

सुलेखा घरातून पळून कुठं दुसरिकडं गेली नाही. तिनं थेट पालकोटच्या BDO अधिकाऱ्याकडं तक्रार केली. त्यांनी सुलेखाला बाल कल्याण समितीकडं पाठवलं. या समितीच्या अधिकाऱ्यांनी सुलेखाला संरक्षण तर दिलंच त्याचबरोबर तिच्या पुढील शिक्षणाची देखील सोय केली आहे. सुलेखाच्या या साहसाची सध्या संपूर्ण गुमला जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. प्रत्येक अल्पवयीन मुलीनं आपला विवाह रोखण्यासाठी या प्रकारचं धाडस दाखवण्याची गरज आहे, असं मत या निमित्तानं व्यक्त करण्यात येत आहे.

Published by: News18 Desk
First published: January 25, 2021, 7:28 AM IST

ताज्या बातम्या