मुंबई, 06 एप्रिल: काही दिवसांपूर्वी मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या (Jamil Shaikh Murder) करण्यात आली होती. या हत्येबाबत चौकशी करत असताना यामध्ये राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्ला (Najib Mulla) यांच नाव समोर आलं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना इशारा दिला आहे. तसेच त्यांनी ठाण्याचे राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्लांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. खुनाला उत्तर खुनाने देणं हे सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी योग्य चित्र राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या अनेक मुद्यांना हात घातला आहे. यावेळी त्यांनी अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणावरून परमबीर सिंह यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कारभाराबाबतही चिमटे काढले आहे. त्याचबरोबर मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येबाबतही गंभीर इशारा दिला आहे. तसेच शरद पवार यांची प्रत्यक्षात भेट घेऊन नजीब मुल्लावर कारवाई करण्याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
सत्ताधारी पक्षाचे लोकचं जर नागरिकांना दिवसाढवळ्या मारत असतील तर हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. याबाबत सरकार काय पावलं उचलतयं हे मी पाहणारचं आहे. नाहीतर दुसऱ्यांचेही हात बांधले नाहीत. पण खुनाला उत्तर खुनानं देणं हे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही, असा सक्त इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
(हे वाचा- Raj Thackeray PC : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा)
मनसे पदाधिकारी जमील शेखच्या हत्येप्रकरणाचे धागेदोरे उत्तर प्रदेशापर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा कबुली जबाब नोंदवला असून त्यांनी यामध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचा हात असल्याचं सांगितलं आहे. नजीब मुल्ला यानेचं जमील शेखच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. याशिवाय बिल्डर सूरज परमार यांच्या हत्येतही नजीब मुल्लाचं नाव आलं होतं. पण ते प्रकरणही दडपलं गेलं. पण या प्रकरणात सरकार कोणती पावलं उचलतंय हेही मी पाहतो, असंही राज यांनी म्हटलं आहे.
ठाकरेंच्या हातात राज्य की...
राज ठाकरे असे म्हणाले की, मला एका मित्राने जोक पाठवला. त्यात त्याने उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलं की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय हेच कळत नाही असं म्हटलं होतं. हे अगदी चपखल लागू होतंय, असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Raj Thackeray, Sharad pawar