जालना, 18 सप्टेंबर : शिक्षणाच्या प्रसारानंतर आपला समाज सुधारला असल्याचा दावा केला जातो. मात्र याच दाव्याला धक्का देणाऱ्या घटना वारंवार समोर येत असतात. जालना जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील एका कुटुंबाने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. नकळत्या वयात पालकांनी केलेल्या या कृत्यामुळे धक्का बसलेल्या मुलीने लग्नानंतर अवघ्या 21 दिवसांतच आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. काजल जिवाप्पा नामदे असं मृत मुलीचं नाव आहे. जालना तालुक्यातील इंदेवाडी शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी गावातील ग्रामसेवकाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
नामदे आणि काटकर कुटुंबाने लॉकडाऊन सुरू असतानाच ऑगस्ट महिन्यात काजल नामदे या 14 वर्षीय मुलीचा बालविवाह केला. या विवाहानंतर काजल खूपच अस्वस्थ होती. अखेर 26 ऑगस्ट रोजी तिने आत्महत्या करत आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र या घटनेची कुठेही वाच्छता झाली नाही. अखेर आज 18 सप्टेंबर रोजी इंदेवाडीच्या नगरसेवकांनी या प्रकाराबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने नामदे आणि काटकर कुटुंबातील 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 3 आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आपल्या समाजातील बालविवाहासारखं दाहक वास्तव समोर आलं आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून सदर घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली आहे.