14 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी पुन्हा धक्कादायक खुलासा, आरोपींना अटक केल्याच्या दाव्यानंतर आता वेगळंच सत्य समोर

14 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी पुन्हा धक्कादायक खुलासा, आरोपींना अटक केल्याच्या दाव्यानंतर आता वेगळंच सत्य समोर

रावेर हत्याकांडाच्या पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • Share this:

रावेर, 18 ऑक्टोबर : रावेर हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला अटक केल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. मात्र पोलिसांनी या घटनेत अद्यापपर्यंत केवळ अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आता रावेर हत्याकांडाच्या पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

जळगावमधील रावेर हत्याकांडाच्या घटनेत हत्या झालेल्या पीडितेच्या भावाच्या मित्रांनीच ही हत्या केल्याचा खुलासा पीडितेच्या भावाने केला होता. इतकंच नाही तर आरोपींचा एन्काऊंटर करा अशी मागणी केली होती. पोलिसांकडून मात्र या घटनेतील आरोपींबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील या पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा केला होता.

राज्याचे गृहमंत्री आणि पीडित मुलीचा भाऊ संशयितांविरोधात ठाम दावा करत असले तरी पोलीस अधिकारी मात्र या घटनेत अद्यापपर्यंत अज्ञात व्यक्तींविरोधातच गुन्हा दाखल असून केवळ संशयितांचा तपास सुरू असल्याची माहिती देत आहेत. आज पोलिसांनी पत्रकार परिषदेत घेत या घटनेत अज्ञाताविरोधात हत्येसोबत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याचं सांगत इतर प्रश्नांवर बोलण्यास नकार देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

जळगाव पोलिसांच्या या भूमिकेनंतर सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहे. चार दिवस उलटूनही पोलिसांकडून या घटनेबाबत ठोस कारवाई का केली जात नाही आणि या गुन्ह्याबाबत स्पष्ट माहिती देणे का टाळल जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी पुढील चोवीस तासात आरोपींच्या अटकेबाबत स्पष्ट माहिती न दिल्यास पोलिसांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 18, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading