बीड, 25 नोव्हेंबर : बीड पाटबंधारे विभागाकडून (Beed Irrigation Department) मावेजा मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकर्याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान, मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
अर्जुन कुंडलिकराव साळुंके असं मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अर्जुन साळुंके यांनी बीड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात स्वत:ला पेटवून घेतले होते. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या शेतकऱ्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. अर्जुन साळुंके यांनी यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने अर्जुन यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते.
काय आहे प्रकरण?
बीड तालुक्यातील पाली येथील अर्जुन कुंडलिकराव साळुंके या शेतकर्याची जमीन पाटबंधारे विभागाने संपादित केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पाटबंधारा विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने अर्जुन साळुंके यांनी काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र, याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही.
सोमवारी दुपारी शेतकर्याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. यात ते 50 टाकले भाजले होते. मध्यरात्री अर्जुन साळुंके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अर्जुन साळुंके यांच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. आमचा माणूस निघून गेला आता तरी आम्हाला न्याय द्या, अशी मागणी पुढे केली.