पुणे 06 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेलं खूनाचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या चार दिवसांमध्ये चार जणांचा बळी गेल्याने मोठा हादरा बसला आहे. मंगळवारी कोंढवा भागात तरुणाच्या खून झाल्याचा प्रकार समोर आला. दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून मित्रानेच डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला.
विठ्ठल रामदास धांडे (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश लाला म्हस्के (वय २४) याच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विठ्ठल आणि आरोपी आकाश हे एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघेही दारू घेत बसले होते. त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात आकाश याने विठ्ठल याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
पोलीस आयुक्तालया जवळ झाला होता गोळीबार
पुण्यात सोमवारी सकाळपासून घडलेल्या दोन घटनांनी शहर हादरून गेलं आहे. सकाळी एका गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी पोलीस आयुक्तालयाच्या जवळच गोळीबार झाला. यात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर फैरी झाडून त्याची हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
पुणे हादरलं, नवले पुलाजवळ विचित्र अपघाताचा पहिला VIDEO
घटनास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयही जवळच आहे. त्याच कार्यालयातून ही व्यक्ती निघालेली होती. त्यानंतर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. याच भागात अनेक आंदोलने होत असतात त्यामुळे तिथे कायम पोलीस बंदोबस्तही असतो. अशा भागातच ही घटना घडल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले असून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.