Home /News /crime /

धक्कादायक! मुरबाडमध्ये शिपाई झाला डॉक्टर अन् 5 जणांचा घेतला जीव

धक्कादायक! मुरबाडमध्ये शिपाई झाला डॉक्टर अन् 5 जणांचा घेतला जीव

देशातील पहिले कॅशलेस गाव धसई आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. इथे एका बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुरबाड, 29 जानेवारी : देशातील पहिले कॅशलेस गाव धसई (Murbad News) आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. इथे एका बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर (Bogus Doctor) धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काहीं वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता आणि निवृत्त झाला होता. निवृत्त झाल्यानंतर त्याने चक्क घरात दवाखाना उघडून कोणताही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार सुरू केले होते. पांडुरंग घोलप असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. त्याला आता मुरबाड टोकावडे पोलिसांनी अटक केली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी राम भिवा आणि त्यांची विवाहित मुलगी अलका मुकणे यांना अंगदुखी आणि ताप आल्याने बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपकडे उपचारासाठी गेले होते. उपचारानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्यांनी धसईचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले, मात्र प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याने अलका यांना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे अलकाचा मृत्यू झाला, तर राम भिवा याचा देखील मृत्यू झाला. याआधी याच बोगस डॉक्टर घोलपकडे उपचार घेतलेल्या बारकूबाई वाघ, आशा नाईक आणि लक्ष्मण मोरे यांचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आदिवासी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने आवाज उठवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत आणि कोणताही परवाना नसतांना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बोगस डॉक्टर घोलप याला पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणात मृत्यू झालेले पाचही रुग्ण हे आदिवासी असल्याने अॅट्रोसिटी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी क्रांती सेनेच्या दिनेश जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी मात्र पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या