भिवंडी, 2 डिसेंबर : भिवंडीत अनेक ठिकाणी गोदामांमध्ये अवैध पद्धतीने केमिकलची साठवणूक होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या व अशा अवैध केमिकल साठ्यांविरोधात पोलीस व महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची ओरड सुरू असतानाच नारपोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पूर्णा येथील भानू लॉजिस्टिक्स , मंगलाबाई कंपाउंड गाळा नंबर 4 व 5 तसेच महावीर पेपर कटिंग बिल्डिंग येथील रघुनाथ कंपाउंडमधील गाळा नंबर 5 या दोन ठिकाणी केमिकलचा अवैध साठा केला असल्याची खबर नारपोली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी मंगळवारी छापा मारला असता तिथून 58 लाख 41 हजार 400 रुपये किंमतीचे 567 लोखंडी तर 217 प्लास्टिकचे ड्रम असे एकूण 785विविध प्रकारच्या अत्यंत ज्वलनशील ड्रममध्ये केमिकलचा अवैध साठा केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी हा संपूर्ण अवैध केमिकल साठा जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाच मध्ये छापा मारून 17 लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त केला होता.
सुरेश सारंग कटारीया ( वय 43 रा. कासार आली भिवंडी ) असे अवैध केमिकल साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून त्याने पूर्णा येथील केमिकल साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस एस भोसले करत आहेत.