Home /News /crime /

मंत्र्यांनी दिली होती एनकाउंटरची धमकी, अशा अवस्थेत सापडला Hyderabad Rape Case मधील आरोपीचा मृतदेह

मंत्र्यांनी दिली होती एनकाउंटरची धमकी, अशा अवस्थेत सापडला Hyderabad Rape Case मधील आरोपीचा मृतदेह

सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेला हैदराबादमधला आरोपी आज (16 सप्टेंबर) सकाळी रेल्वे रुळांवर मृतावस्थेत सापडला

हैदराबाद, 16 सप्टेंबर: सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेला हैदराबादमधला (Hyderabad Rape Case) आरोपी आज (16 सप्टेंबर) सकाळी रेल्वे रुळांवर मृतावस्थेत सापडला. तेलंगणाच्या (Telangana) मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच एन्काउंटरचा (Encounter) इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे; मात्र पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी (DGP Telangana) ही घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, पोलिस महासंचालकांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मृत आरोपीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच, मंगळवारी (14 सप्टेंबर) तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं, की 'अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape & Murder) करून तिचा खून करणाऱ्या दोषी व्यक्तीला आम्ही पकडू. त्याला पकडल्यावर त्याचं एन्काउंटर केलं जाईल.' सुरुवातीला पोलीस सूत्रांनी असा दावा केला होता, की यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातल्या त्याच्या मूळ गावातून आरोपीला अटक करण्यात आली आहे; मात्र तो नेमका कुठे आहे, याबद्दल संदिग्धता होती. तेवढ्यातच रेड्डी यांनी केलेल्या एन्काउंटरच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं होतं. त्यातच आज सकाळी आरोपी रेल्वे रुळांवर मृतावस्थेत सापडला आहे. ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 9 सप्टेंबर रोजी या सहा वर्षांच्या मुलीचं तिच्या घराबाहेरून अपहरण करण्यात आलं. अपहरणानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला मारून टाकण्यात आलं होतं. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. बेडशीटमध्ये गुंडाळलेला तिचा मृतदेह आरोपीच्या घरात सापडला होता. तोपर्यंत आरोपीने तिथून पलायन केलं होतं. त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आणि तिचा गळा आवळून ठार केल्याचं उस्मानिया हॉस्पिटलमध्ये केलेल्या शवविच्छेदनातून स्पष्ट झालं. या भयावह प्रकारानंतर नागरिकांनी 10 सप्टेंबर रोजी खूप मोठं आंदोलन केलं. चंपापेट-सागर रोडवर सात तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दोषी व्यक्तीला तातडीने पकडून त्याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, ही मागणी लावून धरण्यात आली. दोषीचं एन्काउंटर करावं, अशी मागणीही काही आंदोलकांनी केली. तपासाला उशीर होत असल्याबद्दल विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दोषी व्यक्तीचं एन्काउंटर करायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे पुत्र के. टी. रामा राव यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न घेतल्याबद्दल रेवंथ रेड्डी यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यात अपयश येत असल्याने भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के. अरुणा यांनीही राज्य सरकारवर टीका केली.
First published:

Tags: Hyderabad

पुढील बातम्या