भिवंडी, 12 ऑक्टोबर : भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथं पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगलने हल्ला करून तिचा खून केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथं राहणारी मयत लक्ष्मी रामरतन भारती (35) हिचा पती राम रतन सुखलाल भारती (40) हा लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पती - पत्नीमध्ये रोज भांडण होत.
याच कारणामुळे रविवारी रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी रामरतन याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगलने जोरदार प्रहार केलेा. यात जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पत्नी लक्ष्मी हिची मैत्रीण अफसाना अलताफ शेख (24) हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी पती राम रतन सुखलाल भारती याला तात्काळ अटक केली आहे.
भिवंडीत गेल्या 9 महिन्यात 4 घटना
भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथं भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून निर्घृण हत्या केली. मात्र याआधीही भिवंडीत पतीने आपल्या जीवनसाथीला संपवल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.
भिवंडी तालुक्यातील पुर्णा या गावात शुल्लक वादातून पतीने लोखंडी पाईप डोक्यावर ,तोंडावर ,पायावर मारून पत्नीचा खून केला होता.
पुर्णा इथंच आपल्या पोटच्या अकरा महिनीच्या चिमुरडीस पत्नीने स्तनपान करण्यास नकार दिल्याच्या रागातून गुरुद्वारात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून हत्या केली होती.
भिवंडी शहरातील श्रीरंग नगर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने पत्नीच्या गळ्याला ब्लॅंकेटने आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याची घटना घडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.