रतलाम, 23 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशमधील रतलाममधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. कनेरी मार्गावर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंध्यवासिनी कॉलनीत राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने 30 वर्षीय दुसरी पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीची हत्या केली. कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर त्याने तिघांना घराच्या व्हरांड्यात खड्डा खोदून पुरलं.
दीनदयाळनगर पोलिसांनी मुख्य आरोपी आणि मृतदेह पुरण्यात मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक केली आहे. आरोपी रेल्वेत नोकरीला असून, त्याचं नाव सोनू आहे. त्याचं पूर्ण नाव सोनू उर्फ सलमान पुत्र राजेश शेख उर्फ रहमत अली आहे. पोलीस आता आरोपीच्या खऱ्या नावाचा शोध घेत आहेत. त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर सोनू तलवारी हे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पोस्ट मॉर्टेमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. या हत्येमागे कौटुंबिक कलह, दुसऱ्या पत्नीच्या मुलांची नावं आयडीमध्ये नसणं, ही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सोनू खाचरौद इथं रेल्वेमध्ये गँगमन म्हणून काम करतो. त्याची पहिली पत्नी नगमाचं पोटगी प्रकरण कोर्टात सुरू आहे. पण तरीही 2014 पासून सोनू त्याची प्रेयसी व दुसरी पत्नी निशा, सात वर्षांचा मुलगा अमन आणि चार वर्षांची मुलगी खुशीसोबत राहत होता. दीड महिन्यापासून निशा आणि तिची मुलं दिसत नसल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी रात्री मिळाली. आरोपी सोनूने काही दिवसांपूर्वी घराबाहेर खड्डाही खणला होता. रविवारी सकाळी पोलिसांनी आरोपी सोनूची कोठडीत चौकशी केली असता, त्याने मित्र बंटी कॅथवासच्या मदतीने खून करून मृतदेह व्हरांड्यात पुरल्याचे सांगितले.
एसपी अभिषेक तिवारी, एफएसएल अधिकारी डॉ. अतुल मित्तल, सीएसपी हेमंत चौहान, दीनदयाळ नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक मंडलोई, कार्यकारी दंडाधिकारी आणि मेडिकल कॉलेजची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. या ठिकाणी चार फूट खोदल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निशा, तिचा मुलगा अमन आणि मुलगी खुशी यांचे मृतदेह सांगाड्याच्या स्वरूपात सापडले.
हेही वाचा - Instagram वर जुनैद झाला बंटी, प्रेमाच्या जाळ्यात फसवत तरुणीसोबत केलं भयानक कांड
मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाणार -
सुरुवातीच्या चौकशीत सोनू तलवारीने माहिती दिली की, त्याच्या पहिल्या पत्नीसोबत त्याचे पोटगीचे प्रकरण सुरू आहे. अशातच निशा लहान मुलांना शाळेत पाठवण्यासाठी वाद घालायची. दीड महिन्यापूर्वी झालेल्या वादातून आधी त्याने मुलांची हत्या करण्यात केली आणि नंतर निशाचीही कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर मृतदेह घरात ठेवले. नंतर मजुरांना बोलवून पाण्याची टाकी बांधायची असल्याचं सांगत त्याने व्हरांड्यात खड्डा खणायला लावला. दुसऱ्या दिवशी मित्र बंटीला याबाबत माहिती दिली. बंटी घरी आल्यावर दोघांनीही मृतदेह खड्ड्यात पुरले. आता खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मृतदेहांची डीएनए चाचणीही केली जाणार आहे, असं एसपी तिवारी यांनी मीडियाला सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.