मुंबई, 23 फेब्रुवारी : आधी सोशल मीडियावर मैत्री आणि नंतर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलकरून अश्लिल चाळे करायचे, त्यानंतर हाच व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 3 जणांना अटक केली आहे.
या टोळक्याने बाॅलिवूड, राजकीय नेते, खेळाडू, व्यावसायिक यांना ब्लॅकमेल करण्यासाठी 171 फेक फेसबुक प्रोफाईल बनवले होते तसंच 5 फेक इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले होते आणि यासाठी त्यांनी वापरलेले 54 मोबाईल फोन देखील मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने जप्त केले आहे. तसंच खंडणीची रक्कम या टोळक्याने विविध 58 बॅंक अकाऊंट मार्फत घेतलं होते. ते 58 बॅंक अकाऊंटही मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गोठवले आहेत.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, हे टोळके राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागात बसून या पद्धतीने अनेक धनाड्यांची फसवणूक करायचे. याकरता ते आधी त्या बाॅलिवूड, राजकीय नेते, खेळाडू, व्यावसायिकाच्या सोशल मीडिया अकाऊंटचा अभ्यास करायचे. विविध पद्धतीचा रिसर्च करायचे आणि त्यानुसार त्या बाॅलिवूड, राजकीय नेते, खेळाडू, व्यावसायिकाला सुंदर मुलींचे फोटो लावून फेक प्राफाईल बनवून ओळख वाढवून व्हिडीओ काॅलद्वारे त्यांचे अश्लिल चाळे रेकाॅर्ड करायचे आणि माॅर्फिंग करुन त्या पीडित व्यक्तीने प्रत्यक्ष संभोग केला असे व्हिडिओ बनवायचे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेला माहितीनुसार, या फेक प्रोफाईल हनी ट्रॅपचे जास्त बळी राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते आणि व्यावसायिक ठरले आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बाॅलिवूड मधील तसंच काही खेळाडूंना चौकशीकरता बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण, या टोळक्याने कोट्यवधी रुपयांची खंडणी या बड्या हस्तींकडून उकळली आहे.
असे होते हॅनी ट्रॅपचे जाळे?
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती रिक्वेस्ट एक्सेप्टकरुन हळू हळू सोशल मीडियावरच ओळख वाढवली जाते. अचानक एके दिवशी ती सुंदर मुलगी फेसबुक मॅसेंजरवर मेसेज करतो. हळूहळू चॅटिंगचा सिलसिला सुरू होतो. याच दरम्यान एकमेकांचे व्हॉट्सअॅपवर नंबर एक्सचेंज होतात. मग काय रात्रंदिवस ती सुंदर मुलगी चॅटिंग करायला सुरुवात करते आणि अचानक एखाद्या मध्यरात्री ती सुंदर मुलगी अचानक व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ काॅल करते आणि तो व्हिडिओ काॅल उचलताच ती सुंदर मुलगी निवस्त्र अश्लिल चाळे करताना त्या व्हिडिओ काॅलिंगमध्ये दिसते. तो लाईव्ह काॅल असल्याने ती महिला अश्लिल चाळे करते ते पाहून समोरची व्यक्ती देखील अश्लिल चाळे करतो. त्या व्यक्तीला असे वाटते की, ती सुंदर मुलगी त्याच्या प्रेमात आहे आणि तिला त्याच्याकडून सेक्सची अपेक्षा आहे. पण काही तासात त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एक फोन येतो. तू माझ्या पत्नीसोबत, मुलीसोबत किंवा आईसोबत अश्लिल चाळे केले आहेत. तुझा व्हिडिओ माझ्याकडे आलाय तुला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारची धमकी देणारा तो फोन असतो.
हा फोन आल्यानंतर नेमकं काय करावं हे त्या पीडित व्यक्तीला कळत नाही. तोच त्याच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरुन एक व्हिडीओ येतो ज्यात त्याने व्हिडीओ काॅलवर केलेल्या अश्लिल चाळ्यांचा व्हिडीओ असतो. मात्,र व्हिडिओ काॅलमध्ये अश्लिल चाळे करत असलेल्या मुलीचा व्हिडीओ नसून दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीसोबत त्या व्यक्तीचा सेक्स व्हिडीओ असतो. धक्कादायक म्हणजे, व्हिडीओ काॅलमध्ये पीडित व्यक्ती जे हावभाव करते ते हावभाव असलेले त्याच्या फक्त चेहऱ्याचे व्हिडिओ कट करुन माॅर्फिंग करुन म्हणजे, साॅफ्टवेअरच्या आधारे त्या पीडित व्यक्तीच्या चेहऱ्याचा व्हिडीओ बनवला जातो. जसं काय पीडित व्यक्तीने व्हिडिओ काॅलवर नाही तर प्रत्यक्षात त्याने त्या महिलेसोबत संभोग केलाय असा व्हिडिओ तयार केला जातो आणि या व्हिडीओच्या आधारे त्या पीडित व्यक्तीकडे खंडणीचे धमकीचे फोन देखील यायला सुरुवात होते.