गुरुग्राम: सुल्तानपुरी-कंझावला हिट अॅण्ड रन सारखी घटना समोर आली आहे. कारने एका दुचाकीला तीन किलोमीटर फरफटत नेलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलला कारने धडक दिली. त्यानंतर कारसोबत 3 किलोमीटरपर्यंत दुचकी फरफटत जात होती.
दुचाकी खाली अडकल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली. मोटारसायकलचा मालक बाऊन्सरचे काम करतो. त्यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री साडेअकराच्या सुमारास तो ड्युटीवरून घरी परतत असताना ही घटना घडली.
बाउन्सर मोनू यांनी सांगितले की, ते रस्त्याच्या कडेला मोटारसायकल लावून शेजारी उभे होते. त्याच वेळी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर दुचाकी कारखाली अडकली. कारचालकाने तिला आपल्यासोबत ओढून नेले. बाईकस्वार मोनू यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.
या घटनेत त्यांच्या दुचाकीचं खूप नुकसान झालं आहे. गुरुग्राम सेक्टर ६५ मध्ये होंडा सिटी कारने मोटारसायकल ओढल्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची दखल घेत पोलिसांनी मोटारसायकल मालक मोनू यांच्याशी संपर्क साधून तक्रार घेतली.
तीन किलोमीटरपर्यंत दुचाकी नेल्यानंतर ती निघाली, त्यावेळी आरोपी आपली कार सोडून फरार झाला. कार चालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फरीदाबादमध्ये राहणारा सुशांत मेहता अशी आरोपीची ओळख झाल्याचं समोर आलं आहे.
1 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये हिट अॅण्ड रन केस समोर आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. मात्र या घटनेत थोडक्यात बाईकस्वार वाचला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Haryana