कानपुर, 24 जानेवारी : उत्तर प्रदेशातील कानपूर देहात (Kanpur Dehat) मध्ये काही तरुणांच्या त्रासाला कंटाळून (Molesters) धक्कादायक पाऊल उचललं आहे. रसूलाबाद पोलीस ठाणे हद्दीत राहणारी दहावीची विद्यार्थिनीने घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली. विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये तिने आत्महत्येचं कारण सांगितलं आहे.
तिच्या परिसरातील सुशील आणि आमिर हे दोघेजण तिला त्रास देत होते. वारंवार त्यांच्याकडून सुरू असलेल्या छेडछाडीतून तरुणीने हे धक्कादायक पाऊल उचललं. पीडितेच्या सुसाइड नोटनुसार काही दिवसांपूर्वी तिने पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार केली होती, मात्र पोलिसांकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं विद्यार्थिनीने लिहिलं आहे. शनिवारी रात्री या गुडांच्या त्रासाला कंटाळून घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थिनीचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर कुटुंबीयांनी रसूलाबाद पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणात एक सुसाइड नोट सापडली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा-रिसॉर्टमध्ये गेलेल्या कुटुंबासोबत भीषण प्रकार; टेन्टमध्ये होता मुक्काम, अचानक...
हे प्रकरण समोर आल्यानंतर कानपूर देहातचे एसपी केशव चौधरी यांनी सांगितलं की, तक्रार मिळाल्यानंतर याचा तपास करण्यात येईल. जर या प्रकरणात कोणी पोलीस कर्मचारी दोषी असल्याचे आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले की, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.