यमुनानगर, 22 जानेवारी : रात्रीचं जेवण बनवताना दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादामध्ये एकानं जेवण बनवण्यास नकार दिला, म्हणून त्याची दुसऱ्या मित्रानं हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
हरियाणातील (Haryana) यमुनानगर (Yamunanagar) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. शत्रुघ्न असं मृत तरुणाचं नाव असून तो बिहारचा होता. शत्रुघ्नसह बिहारमधील 20-25 जण यमुनानगरमधील गोदामात काम करतात. रात्री शत्रुघ्नचं जेवण बनवताना जवळ बसलेल्या बिंदेश्वरशी भांडण झालं. या भांडणानंतर त्यानं जेवण बनवण्यास नकार दिला. त्यावेळी बिंदेश्वरनं त्याच्या छातीवर वीट फेकली. यामध्ये तो जखमी झाला. त्यानंतर शत्रुघ्नचे मेहुणे राजेश तसंच अन्य मित्रांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यावेळी उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
(हे वाचा-10 लग्न केल्यानंतरही झालं नाही मूल; शेवटी शेतात मृत अवस्थेत आढळला शेतकरी)
आरोपीला अटक
या प्रकरणात राजेशनं दिलेल्या जबानीनंतर पोलिसांनी बिंदेश्वरच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शत्रुघ्नचा मृतदेह त्याच्या जवळच्या व्यक्तींकडं सोपवण्यात आला आहे.
घरच्यांची भेट झालीच नाही
मृत शत्रुघ्नला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलांनी वडिलांना घरी येण्याची विनंती फोनवरुन केली होती. त्यावेळी काही पैसे जमा करुन फेब्रुवारीमध्ये शत्रुघ्न घरी जाणार होता, अशी माहिती त्याच्या मेहुण्यानं दिली आहे. मात्र तोपर्यंत असं काही होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. पोलिसांनी या प्रकाराची माहिती त्याच्या बिहारमधील कुटुंबीयांना दिली आहे. त्यांना या सर्व प्रकाराचा मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder